इनकमिंग सुरूच! शिंदे गटात 17 अपक्ष उमेदवारांचा प्रवेश

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
लातूर,
Latur municipal elections 2026, आगामी लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाका लावला आहे. यंदाच्या निवडणुकीत उभे असलेल्या तब्बल 17 अपक्ष उमेदवारांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शविला असून सर्वांनी पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांसाठी निवडणूक सोपी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
Latur municipal elections 2026,


 
या 17 अपक्ष उमेदवारांमध्ये श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश आहे. काही जण यापूर्वी भाजपमध्ये, काही स्वतंत्र उमेदवार म्हणून तर काही इतर पक्षांमध्ये कार्यरत होते. आता सर्वांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद आणि समन्वय दोन्ही वाढल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.लातूर महानगरपालिकेची एकूण जागा 70 असून, निवडणूक 18 प्रभागांमध्ये होत आहे. या निवडणुकीत भाजप सर्व जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे, तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करून 70 पैकी 65 जागांवर उमेदवार उभे केले आहेत आणि पाच जागांवर वंचित बहुजन आघाडीला संधी दिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट 60 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर 10 जागांवर पुरस्कृत उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट 17 जागांवर अधिकृत उमेदवारांनी लढत सुरू केली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) 11 जागांवर अधिकृत उमेदवार उभे करणार आहे आणि शिवसेना (ठाकरे गट) 9 जागांवर लढत आहे. याशिवाय, MIM 9 जागांवर उमेदवार लढवत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, अपक्ष उमेदवारांचा शिंदे गटात प्रवेश हा पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे. यामुळे काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये निवडणूक ही शिंदे गटासाठी सुलभ होऊ शकते, आणि पक्षाची धोरणात्मक बाजू मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर लातूर महापालिका निवडणूक 2026 ही रंगतदार आणि अत्यंत स्पर्धात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.