सिरोंचा,
construction work सिरोंचा तालुक्यात दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेली रस्त्यांची कामे अद्याप सुरू न करणार्या कंत्राटदारांविरोधात आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित कंत्राटदारांचे कंत्राट तत्काळ रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिले. विकासकामांमध्ये होत असलेली दिरंगाई ही थेट नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बुधवारी सिरोंचा येथे नगरपंचायत तसेच तहसील कार्यालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आमदार आत्राम यांनी घेतला. या बैठकीत प्रशासनाकडून विविध विभागांच्या प्रलंबित कामांची माहिती घेण्यात आली. यावेळी मंजूर असूनही कामे सुरू न झाल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निधी उपलब्ध असूनही कामे रखडत असतील तर त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरपंचायत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस नगराध्यक्ष फरजाना शेख, उपाध्यक्ष बबलू पाशा, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार अजय संकुदरवार, नगरसेवक व नगरसेविका, तसेच संबंधित अभियंते उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, कार्यकारी जिल्हाध्यक्ष सतीश भोगे, नगरसेवक जगदीश रालंबडीवार, सतीश राचर्लावार, महिला जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली यांनीही उपस्थिती दर्शविली.
आढावा बैठकीत आमदार आत्राम यांनी सर्व विभागप्रमुखांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रलंबित विकासकामे ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करावीत, नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच कामांची गुणवत्ता व वेळेचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी नगरपंचायत अंतर्गत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते घरकुल मंजुरीची पत्रे (वर्क ऑर्डर) वितरित करण्यात आली. लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम तातडीने सुरू करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ते वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले.construction work प्रशासनानेही लाभार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. बैठकीदरम्यान नागभूषणम चकिनारपुवार, सत्यम पिडगू, ओमप्रकाश ताटीकोंडावार, माजी उपसभापती कृष्णमूर्ती रिक्कुला, व्यंकटेश पुजारी यांचीही उपस्थिती होती. आढावा बैठकीत ग्रामीण रुग्णालयातील समस्या, भूमी अभिलेखाशी संबंधित कामकाज, पाणीपुरवठा योजना, नगरपंचायत इमारतीची दुरवस्था, पर्यटन विकासाच्या शक्यता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व स्मारक, पाणंद रस्ते, शासन निर्णयांतर्गत (जीआर) विकास योजना, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, रेशनकार्ड व धान्य वितरण व्यवस्था, आश्रमशाळांतील धान्य पुरवठा, शिवभोजन थाळी योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, कृषी व फलोत्पादन विभागाचे कामकाज, सिंचन विहिरी तसेच तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या नवीन इमारतींच्या बांधकामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर विभागप्रमुखांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. विकासकामे वेळेत पूर्ण करून त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगत आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आढावा बैठक समाप्त केली.