mangalprabhat lodha विज्ञान म्हणजे केवळ एआय तज्ज्ञ किंवा आयटी अभियंते घडविण्याचे साधन नसून, ज्ञानातून नवे शोध निर्माण करण्याची सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्राचीन काळापासून विज्ञानाची परंपरा जपणाऱ्या भारताचा वैज्ञानिक पाया अत्यंत मजबूत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
विदर्भ विज्ञान महोत्सवाचा उदघाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ व धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विदर्भ विज्ञान महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी अंबाझरी तलावाजवळील महाविद्यालयाच्या परिसरात मंत्री लोढा यांच्या हस्ते थाटात झाले.
यावेळी बोलताना मंत्री लोढा यांनी भारताने जगाला शून्य दिले असून भारतीय विचारसरणी ही मूळतः वैज्ञानिक असल्याचे सांगितले. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर पीडब्ल्यूडी नागपूर विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. माने, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, विज्ञान भारतीचे क्षेत्र संघटन मंत्री श्रीप्रसाद, धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, सचिव प्रकाश इटनकर, प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे आदी मान्यवर उपस्थित होते.mangalprabhat lodha या महोत्सवात नागपूर जिल्ह्यातील बी.एस्सी. व एम.एस्सी. विद्यार्थ्यांचे सुमारे ४० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. तसेच ‘क्लायमेट चेंज’, ‘वन हेल्थ’ आणि ‘डिफेन्स’ या विषयांवर आधारित रांगोळी, पोस्टर, विज्ञान मॉडेल व नाटिका स्पर्धांची विदर्भस्तरीय अंतिम फेरी येथे पार पडली. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.