आगीचे कारण ‘शॉर्ट सर्किट’ नाही

सा. बां. विद्युत विभागाचा अहवाल *जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरण

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
वर्धा,
hospital fire incident जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक २ च्या दुसर्‍या माळ्यावर २३ डिसेंबर रोजी आग लागल्याची घटना घडली. याच घटनास्थळाचे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांनी निरीक्षक करून आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात आगीस ‘शॉर्ट सर्किट’ हे कारण नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही आग कुणी हेतुपुरस्सर तर लावली नाही ना, अशी चर्चा आरोग्य विभागात रंगत आहे.
 

fire 
 
जिल्हा सामान्य रुग्णालयात २३ डिसेंबरला दुपारी अचानक लागलेल्या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पण, या आगीत १० वर्षांचा जन्माचा रेकॉर्ड व इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली. इतकेच नव्हे तर घटनेच्या चौकशीसाठी समितीही गठीत करण्यात आली. या समितीने अद्यापही आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला नाही. पण घटनेच्या नंतर सामान्य रुग्णालयातील आगग्रस्त परिसराची सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांनी बारकाईने पाहणी केली. पाहणी दरम्यान अधिकार्‍यांनी केलेल्या सुक्ष्म निरीक्षणात ज्या खोलीत आग लागली त्या खोलीत असलेल्या खराब झालेल्या चादरी, ब्लँकेट, जुन्या औषधींच्या बॉटल्स, काही वैद्यकीय उपकरणे तसेच काही जुना अभिलेख जळालेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीत कुठलेही विद्युत उपकरण आढळून आलेले नाही. शिवाय बालरोग विभागातील कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांनी विचारणा केल्यावर सदर खोलीत एक विद्युत ट्युबलाईट व एक बोर्ड होता. तो आगीमुळे नष्ट झाल्याचे दिसले.hospital fire incident त्यानंतर खोलीतील व खोलीबाहेरील विद्युत वाहिणींची पाहणी केल्यावर खोलीच्या बाहेरील संपूर्ण विद्युत वायरिंग जळालेली आढळली. विद्युत डीबीची पाहणी केली असता आरसीसीबी आणि एमसीबी या ट्रीप अवस्थेत आढळल्या. पण, डीबीच्या आऊटगोईंग वायर हा सुस्थितीत आढळला. शिवाय कोणतेही वायर हे एकमेकांना चिपकलेले किंवा जळलेले आढळले नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किट होत आग लागण्याची शयता कमी असल्याचे सा. बां. विद्युत विभागाच्या तज्ज्ञांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.