शासकीय विश्रामगृह झाले भकास

ठिकठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य; देखभाल दुरुस्तीकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
गोंदिया,
government guesthouse जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाला गेल्या वर्षभरापासून अवकळा आली आहे. वर्षभरापासून देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचला असून साहित्य देखील चोरीला जात आहेत. तर दुसरीकडे विश्रामगृहातील स्वच्छतागृह आणि खोल्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून त्या कंत्राटदाराला शहरातील काही मोठे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांचे पाठबळ असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
 

vastigruh 
 
 
एकेकाळी गोंदियातील विश्रामगृह म्हणजे येथे थांबणार्‍या आगंतुकांचे आवडते स्थान होते. याठिकाणी कर्मचारी देखील भरपूर होते. त्याचबरोबरीने मोठ्या प्रमाणात चांगल्या सोयी आणि सुविधा देखील देण्यात येत होत्या. त्यामुळे येथे थांबणार्‍यांची मोठी गर्दी असायची. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून येथील विश्रामगृह आणि परिसराची देखभाल, दुरुस्ती करणार्‍या कंत्राटदारावर प्रशासनाचा दबाव होता. त्यामुळे स्वच्छता आणि सुविधा देखील उत्तम होती. मात्र गेल्या वर्षभरापूर्वी येथील देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट एका बाहेरील व्यक्तीला देण्यात आले. त्याने निविदेत तब्बल ४९ टक्के बिलोमध्ये निविदा भरल्याने त्याला कंत्राट गेले. एवढ्या कमी दराची निविदा उघडण्यात आल्यामुळे कंत्राटदाराकडून आता सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यातच त्या कंत्राटदाराने कर्मचारी कपात केली. त्यामुळे कर्मचारीवर्गही अपुरा आहे. परिणामी शासकीय विश्रामगृहाचा परिसर कचर्‍याने माखला असताना दुर्गंधी पसरली आहे. खोल्यांची देखील प्रचंड दुरवस्था झाली आहे.government guesthouse खोल्यांमधील स्वच्छतागृहाचा विषय न काढलेलाच बरा. अनेक खोल्यांमधील साहित्य तुटलेले आहे. या सर्व प्रकारामुळे आता या विश्रामगृहात येणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. तर दुसरीकडे अधिकारी आणि काही मोठ्या लोकप्रतिनिधींचे कंत्राटदारावर विशेष प्रेम असल्यामुळे त्या कंत्राटदाराची साधी विचारणा करण्याचे औचित्य देखील दाखविण्यात येत नसल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचार्‍याने सांगितले.
सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर
आज, ९ जानेवारी रोजी भरदुपारी २ वाजताच्या सुमारास लोखंडी जाळ्या चोरून नेत असलेल्या दोन तरूणांना काही लोकांनी पकडले. दोघांना चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. भर दुपारी साहित्याची चोरी होत असल्यामुळे विश्रामगृह व त्यातील साहित्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
मोठी व्यक्ती आल्यावरच सफाई
या विश्रामगृहात राजकीय मंडळी आणि मोठे अधिकारी अधूनमधून येत असतात. मोठे अधिकारी, पालकमंत्री आणि इतर बडे आसामी येथे आल्यावरच स्वच्छतेचे सोपस्कार आटोपण्यात येते. एरव्ही मात्र परिसर साधा झाडून देखील काढण्यात येत नाही. केवळ व्हीआयपी खोल्यांची तेवढी स्वच्छता करण्यात येते. इतर खोल्यांमधील चादरी महिनोमहिने स्वच्छ केले जात नसल्याची देखील ओरड आहे.