वरूड,
pimpal khuta villagers गावातील मुलं शिकली पाहिजे या उद्दात्त हेतूने सरपंचाच्या संकल्पनेतून तालुक्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. सायंकाळी ७ वाजता सायरनचा भोंगा वाजवून मोबाइल, टीव्ही बंद करून अभ्यासाला लागण्याची सूचना ग्रामस्थांना दिली जाते.

मोबाईल, टीव्हीच्या नादात भरकटलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा देण्यासाठी पिंपळखुटा ग्रामवासीयांनी दररोज सायंकाळी ७ वाजता मोबाईल आणि टीव्ही बंद करून सर्व मुलांना अभ्यासाला बसवण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. हा उपक्रम रात्री नऊ वाजेपर्यंत केवळ दोन तास राबविला जातो. अभ्यासाचा भोंगा या प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावचे सरपंच गजानन पडोळे, उपसरपंच, सदस्य तसेच शिक्षक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पिंपळखुटा गाव अमरावती जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहेत. या उपक्रमामुळे गावातील मुला-मुलींमध्ये शिस्त, एकाग्रता व अभ्यासाची ओढ निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. अभ्यासाचा भोंगा या अनोख्या उपक्रमाची गटविकास अधिकारी सुभाष पिल्लारे, विस्तार अधिकारी नितीन सुपलेसह पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पथकाने तपासणी केली असता रात्री नियोजित दोन तासात घराघरांत मुलं-मुली अभ्यासात व्यस्त दिसून आले.pimpal khuta villagers पिंपळखुटा गावात रात्री ७ ते ९ या दोन तासात विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, उच्च विद्याविभूषित व्हावे, या उद्देशाने गावातील विद्युत खांबावर भोंगा लावून त्यामध्ये सायरन वाजवून ग्रामपंचायती मधून सूचना दिल्या जाते. वेळीच सर्व ग्रामस्थ मोबाईल, टीव्ही बंद करून मुलांना अभ्यासाला बसवितात. त्यामुळे हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. मोबाईल, टीव्हीला बाजूला ठेवून ज्ञानाला प्राधान्य देणार्या या उपक्रमामुळे गावातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मजबूत होणार आहे.