‘मौनातले आभाळ’ कविता संग्रहाचे उत्साहात प्रकाशन

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
नागपूर,
poetry dhanashree dharkar कवयित्री धनश्री धारकर यांच्या ‘मौनातले आभाळ’ या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी बी. आर. ए. मुंडले शाळेच्या नवदृष्टी सभागृहात उत्साहात पार पडला. ठाणे येथील उद्वेली प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे तर, प्रमुख पाहुण्या म्हणून पहिल्या महिला मराठी गझलकारा व साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्ष आशा पांडे यांच्यासह सुप्रसिद्ध कवयित्री सना पंडित यांची उपस्थिती होती. दैनिक तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे यांच्या हस्ते ‘मौनातले आभाळ’ या कविता संग्रहाचे औपचारिक प्रकाशन पार पडले.

धनश्री धारकर  
 
 
यावेळी आशा पांडे यांनी मौन आणि आभाळ एकमेकांना पूरक असल्याचे सांगितले. तसेच आभाळाच्या विविध रुपांच्या माध्यमातून विविध मानवी भावना या कवितांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न धनश्री धारकर यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले. शैलेश पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी कविता क्षेत्रात दमदार कवयित्रीचा पदार्पण झाला असून पुढच्या काळात उत्तम कवयित्री बनणार याची खात्री हा कविता संग्रह देत असल्याचे सांगितले. मनोगत व्यक्त करताना कवयित्री धनश्री धारकर यांनी या संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांचा मोठा आधार लाभल्याचे त्यांनी सांगितले.
भावविश्व, स्त्रीमन, संवेदनशील अनुभव आणि जीवनातील सूक्ष्म जाणिवा यांचे प्रभावी शब्दांकन करणारा हा कविता संग्रह वाचकांना नव्या भावनाविश्वात घेऊन जाणारा असल्याचे प्रतिपादन सना पंडित यांनी केले.poetry dhanashree dharkar अध्यक्षीय भाषणात आपला वर्तमान काय सांगतो आणि यापलीकडे आपण काय सांगू शकतो हे ज्याला गवसतं तोच इतरांच्या तुलनेत चार पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. हाच प्रयत्न या कवितांच्या माध्यमातून कवयित्रीने केला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात साहित्यिक, कवी, वाचक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.