भारतावरचा टॅरिफ मागे घेणार ट्रम्प? पुढील चार तासांत मोठ्या निर्णयाची शक्यता

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
trump-withdraw-tariffs-on-india अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून अमेरिकेने नव्या टॅरिफ धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, त्याचा सर्वात मोठा फटका भारतासह अनेक देशांना बसला आहे. भारत एकटाच नाही, तर ब्राझीलसह अनेक राष्ट्रांवर अमेरिकेने वेगवेगळ्या टक्केवारीने आयात शुल्क लादले आहे. या धोरणामुळे अमेरिकन सरकारच्या महसुलात वाढ झाली असली, तरी त्याच वेळी देशांतर्गत महागाईने उग्र रूप धारण केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने उद्योगजगत आणि सामान्य ग्राहक अडचणीत सापडले आहेत.
 
 
trump-withdraw-tariffs-on-india
 
या पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. trump-withdraw-tariffs-on-india टॅरिफच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प सरकारविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अंतिम निर्णय दिला जाणार आहे. या निर्णयासाठी अवघे काही तास शिल्लक असून, संपूर्ण जगाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. ट्रम्प प्रशासनाने विविध देशांवर ५, १० ते ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला असून, त्याविरोधात दाखल याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, अशा प्रकारे एकतर्फी टॅरिफ लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालय आज आपला निर्णय जाहीर करणार आहे. जर हा निर्णय ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात गेला आणि न्यायालयाने टॅरिफ अवैध ठरवला, तर अमेरिकेला हे निर्णय मागे घ्यावे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतासह सर्व देशांवरील टॅरिफ रद्द होऊ शकतो. यासोबतच, टॅरिफमुळे आयातदारांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे, त्याची भरपाईही ट्रम्प प्रशासनाला करावी लागू शकते. मात्र, जर न्यायालयाचा कौल ट्रम्प यांच्या बाजूने लागला, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी टॅरिफमध्ये आणखी वाढ होऊ शकते. आधीच ट्रम्प यांनी ५०० टक्के टॅरिफच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे निकाल ट्रम्प यांच्या बाजूने गेल्यास अनेक देशांना व्यापाराच्या आघाडीवर मोठा आर्थिक धक्का बसू शकतो.