वर्धा,
waibhav Manmode आयुष्यात एखाद्या मुलाला आई-वडिलांचे प्रेम आणि छत्र लाभत नाही तेव्हा तो त्याच्यासाठी अत्यंत दुःखद अनुभव असतो. मात्र, काही मुले या दुःखावर मात करत नव्या आशा व कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात पुढे जातात. अशीच एक प्रेरणादायी व्यथा वर्धा येथील आसमंत स्नेहालयातील विद्यार्थी वैभव मानमोडे याची आहे. ज्याने आपल्या संघर्षातून यशाची नवी उंची गाठली आहे.
वैभवचे बालपण अडचणींनी भरलेले होते. लहानपणीच तो अनाथ झाला. काही काळ नातेवाइकांकडे राहिल्यानंतर त्याची परिस्थिती पुन्हा अस्थिर झाली. अशावेळी आसमंत स्नेहालयाचे प्रमुख शिवाजी चौधरी यांनी त्याला मार्गदर्शन दिले. चौधरी यांनी केवळ सुरक्षित निवाराच दिला नाही, तर त्याच्या मेहनतीची व आत्मविश्वासाची दखल घेत योग्य शिक्षणाच्या दिशेनेही प्रोत्साहित केले. शिवाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवने अभ्यासात सातत्याने परिश्रम घेतले. बी. एस. डब्ल्यू. अभ्यासक्रमात त्याने नागपूर विद्यापीठातून सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे केवळ आसमंत स्नेहालयाचेच नव्हे, तर वर्धा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले. मात्र, वैभवच्या या सुवर्ण यशाला योग्य मान्यता मिळायला हवी असताना, नागपूर विद्यापीठाने त्याला दीक्षान्त समारंभासाठी आमंत्रित केले नाही. विद्यापीठाचे म्हणणे आहे, की बी. एस. डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही प्रायोजक उपलब्ध नसल्याने त्यांचा सन्मान करता आला नाही. ही बाब केवळ वैभवसाठी नव्हे, तर समाजासाठीही वेदनादायक आहे.
वैभवचे यश जिद्दीची कहाणी : शिवाजी चौधरी
वैभवचा संघर्ष व यश ही एका अनाथ मुलाच्या जिद्दीची कहाणी आहे. कठीण परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेले यश अत्यंत प्रेरणादायी आहे. तरीही विद्यापीठ प्रशासनाकडून दीक्षान्त समारंभात त्याचा सन्मान न होणे, हा अनाथ मुलाच्या संघर्ष व यशाचा अपमान नाही काय, असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे. ही काही किरकोळ बाब नाही. एखादा अनाथ मुलगा आपल्या कष्टाच्या जोरावर एवढे मोठे यश मिळवतो. तेव्हा त्याला सन्मान मिळायलाच हवा. त्याला त्या सन्मानापासून वंचित ठेवणे म्हणजे त्याच्या मेहनतीचा अपमान आहे. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात तातडीने पावले उचलली पाहिजे, असेही चौधरी म्हणाले.