अनिल कांबळे
नागपूर,
sexual-assault-on-schoolgirl शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दंड न भरल्यास आरोपीला ६ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निर्णय दिला.
सूरज सेवकराम बांदेकर (वय २७) असे आरोपीचे नाव असून तो सफाई कामगार आहे. तो स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी अधूनमधून शाळेत जात होता. ही संतापजनक घटना १२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ च्या सुमारास आनंदनगर येथील एका शाळेत घडली होती. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलगी १० वर्षे वयाची होती. ती शाळेतील स्वच्छतागृहात गेली असता, आरोपीने तिच्यामागे जाऊन स्वच्छतागृहाचे दार आतून बंद केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला दोषी ठरवले. सरकारी वकील ॲड. कल्पना पांडे यांनी सरकारकडून बाजू मांडली.