क्रेडिट कार्डवरून ५.८८ लाखांचा गंडा

व्यक्ती चीनमध्ये असताना भारतात फसवणूक

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
588-lakh-swindled-via-credit-card कामानिमित्त चीनमध्ये गेलेल्या शहरातील ५५ वर्षीय आर्किटेक्टच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल ५ लाख ८७ हजार ९९१ रुपयांचे १३ अनधिकृत व्यवहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमरजीतसिंग हरभजनसिंग सुरी (५५, रा. लकडगंज) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते इंडसलँड बँकेचे क्रेडिट कार्डधारक असून, त्यांच्या मुख्य कार्डाशी पत्नी, मुलगा आणि सुनेची अतिरिक्त कार्डे जोडलेली आहेत.

588-lakh-swindled-via-credit-card
सुरी हे कामानिमित्त ८ जून रोजी चीनला गेले होते. दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण सहा लाख रुपयांच्या कर्जासाठी जामीनदार राहिल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. मात्र, आपण कोणत्याही कर्जासाठी जामीनदार राहिलो नसल्याचे सुरी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला.
चीनमध्ये असतानाच बँकेचे अलर्ट
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सुरी हे अद्याप चीनमध्ये असतानाच त्यांच्या मोबाइलवर बँकेकडून क्रेडिट कार्डवरील व्यवहारांचे अलर्ट येण्यास सुरुवात झाली. २० ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या परवानगीशिवाय तब्बल १३ व्यवहार झाल्याचे बँकेच्या अलर्टमधून समोर आले. या व्यवहारांमधून एकूण ५ लाख ८७ हजार ९९१ रुपये खर्च करण्यात आले होते. सुरी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपण यापैकी कोणताही व्यवहार केलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपला ओटीपी, पिन, सीव्हीव्ही किंवा अन्य गोपनीय बँकिंग माहिती कोणाशीही शेअर केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सायबर पोर्टलवर तक्रार
प्रकार लक्षात आल्यानंतर सुरी यांनी बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधून क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर फसवणुकीची तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून १३ही व्यवहारांची माहिती, व्यवहारासाठी वापरण्यात आलेली खाती आणि डिजिटल पुरावे तपासण्यात येत आहेत. क्रेडिट कार्डची माहिती आरोपीपर्यंत कशी पोहोचली आणि चीनमध्ये असतानाही कार्डवरून झालेले व्यवहार नेमके कोणाच्या माध्यमातून करण्यात आले, याचा तपास पाचपावली पोलिस करीत आहेत.