tukaram-mundhe बॉलिवूड अभिनेते अनेकदा पान आणि गुटख्याशी संबंधित उत्पादनांसह मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसतात. आता, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अशा जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या सेलिब्रिटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका कार्यक्रमात मुंडे यांनी पान आणि गुटख्यासारख्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, जर एखादा सेलिब्रिटी लोकांना पान किंवा गुटखा खाण्यासाठी प्रोत्साहित करत असेल, तर त्यांनी आधी स्वतः त्याचे सेवन करावे, आपल्या मुलांनाही त्याची सवय लावावी. त्यानंतरच त्यांनी इतरांना सल्ला द्यावा.

मुंडे पुढे म्हणाले, लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी वेगवेगळे मापदंड ठेवू नयेत. जर कोणी एखाद्या उत्पादनाचा प्रचार करत असेल आणि लोकांना ते वापरण्यासाठी प्रोत्साहित करत असेल, तर त्यांनी त्याची जबाबदारीही घ्यायला हवी़ एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री केवळ जाहिरातीसाठी आपला चेहरा देतात़ परंतु उत्पादनाची कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर नसते, या युक्तिवादाशी मी सहमत नाही़ माझ्या मते, ब्रँड प्रमोशन केवळ चेहरा दाखवण्यापुरते मर्यादित नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र एफडीएने गुटखा जाहिरातीसंदर्भात अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशा जाहिरातींमुळे प्रतिबंधित पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनांचे अप्रत्यक्ष किंवा पर्यायी प्रमोशन होऊ शकते, असा एफडीएचा आराेप आहे. एफडीएने बजावलेल्या नोटिसांवर ११ ऑगस्ट ही तारीख आहे. या नोटिसांमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ आणि त्याच्याशी संबंधित नियमांचा संदर्भ देण्यात आला आहे. अभिनेत्यांना नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी प्रतिसाद सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
एफडीएने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, बाजारात गुटखा ब्रँडची ओळख प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडलेली आहे. त्यात महाराष्ट्रातील पान मसाला उत्पादनांवरील बंदीचाही उल्लेख होता. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी कारणे दाखवा नोटीसला प्रतिसाद दिला आहे. यापैकी दोन अभिनेत्यांनी सुनावणीची विनंती केली आहे. सध्या, या प्रकरणात एफडीएची पुढील कारवाई आणि अभिनेत्यांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरेल.