आदिनाथ कोठारेचा नवा अंदाज!

‘नई नवेली’मध्ये यामी गौतमसोबत दिसणार फ्रेश जोडी

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
मुंबई

adinath kothare राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत असलेला आदिनाथ आता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉरर, कॉमेडी आणि कौटुंबिक भावनांचा सुरेख मेळ असलेल्या ‘नई नवेली’मध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, आदिनाथ आणि अभिनेत्री यामी गौतम यांची फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 


adinath kothare new movie nai naveli trailer with yami gautam 
‘नई नवेली’च्या ट्रेलरमध्ये पहिल्याच फ्रेमपासून आदिनाथचा रुबाबदार आणि वेगळा अंदाज लक्ष वेधून घेतो. अवस्थी कुटुंबाच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या हॉरर-कॉमेडी कथेत कौटुंबिक नातेसंबंध आणि मनोरंजनाची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे आदिनाथची भूमिका नेमकी कोणत्या वळणावर प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘रामायण’नंतर आदिनाथचा हा आणखी एक हिंदी चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये त्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि विषय हाताळण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत आपल्या अभिनयातून विविध छटा दाखवणाऱ्या आदिनाथचा ‘नई नवेली’मधील अंदाज त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक वेगळी बाजू समोर आणण्याची शक्यता आहे.
वैविध्यपूर्ण कथा आणि आव्हानात्मक भूमिका निवडण्याकडे आदिनाथचा कल राहिला आहे. त्यामुळे ‘नई नवेली’मधील त्याची व्यक्तिरेखा आणि त्याचा अभिनय कशा पद्धतीने खुलतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. यामी गौतमसोबतची त्याची जोडीही या चित्रपटाचे एक आकर्षण ठरणार आहे.
निर्माते आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली ‘नई नवेली’ची निर्मिती करण्यात आली आहे. बालाजी मोहन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी कथा लिहिली आहे. हॉरर, विनोद आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मिलाफ असलेला हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
एकीकडे ‘नई नवेली’च्या माध्यमातून आदिनाथ कोठारे हिंदी चित्रपटसृष्टीत नवी भूमिका साकारताना दिसणार आहे, तर दिवाळीच्या मुहूर्तावर तो ‘रामायण’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आगामी काळात आदिनाथच्या अभिनयातील दोन वेगळ्या छटा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.