ऑस्ट्रेलियाचा ‘वार’ आणि...

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
दुबई,
australia आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान क्रिकेट संघाला एका स्थानाचा फटका बसला आहे. पाकिस्तान सध्या एकही एकदिवसीय सामना खेळत नसतानाही ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातील विजयामुळे त्याची क्रमवारी बदलली. या निकालानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मागे टाकत चौथे स्थान मिळवले, तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर घसरला.
 
pakistan
 
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच संपली. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. त्यामुळे अंतिम सामना औपचारिकतेचा ठरणार असे दिसत असतानाच ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी विजय मिळवला. मात्र, पावसामुळे सामन्यावर परिणाम झाला आणि डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. या निकालाचा थेट परिणाम आयसीसी क्रमवारीवर झाला.
 
सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांचे १०० रेटिंग गुण होते. पाकिस्तान चौथ्या, तर ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर होता. अंतिम सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे रेटिंग १०२ झाले आणि त्यांनी चौथे स्थान मिळवले. पाकिस्तानचे रेटिंग १०० कायम राहिल्याने त्याला एका स्थानाने खाली यावे लागले. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून ती जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल.
 
पाकिस्तानचा पुढील एकदिवसीय कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये श्रीलंका आणि इंग्लंडसोबत होणाऱ्या तिरंगी मालिकेमुळे महत्त्वाचा ठरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १८ ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तानला या मालिकेत चांगली कामगिरी करून पुन्हा चौथे स्थान मिळवण्याची संधी असेल. मात्र, पराभव झाल्यास त्याच्या क्रमवारीतील रेटिंगवर आणखी परिणाम होऊ शकतो.