मुंबई
Captain Smit Machar दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानात दोन वैमानिकांमध्ये झालेल्या धक्कादायक झटापटीच्या वेळी प्रसंगावधान राखत विमानाचा ताबा घेणाऱ्या भारतीय कॅप्टन स्मित माछर यांच्या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे माछर यांच्या शौर्याला सलाम केला. विशेष म्हणजे, जगभरात चर्चेत आलेले कॅप्टन माछर हे दुबईचे नसून मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी आहेत.
बुधवारी दुबईहून तेल अवीवकडे उड्डाण करणाऱ्या बोईंग ७३७ मॅक्स विमानाच्या कॉकपिटमध्ये माछर आणि त्यांच्या सहवैमानिकामध्ये वाद झाला. याचदरम्यान सहवैमानिकाने माछर यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात जखमी होऊनही माछर यांनी विमानावरील नियंत्रण सोडले नाही. त्या वेळी विमान सुमारे ३० हजार फूट उंचीवर होते आणि अचानक अतिशय वेगाने खाली येऊ लागले. उपलब्ध आकडेवारीनुसार, अवघ्या २९ सेकंदांत विमान ३०,८७५ फुटांवरून १६,७५० फूट उंचीवर आले. विमान सुमारे ३० हजार फूट प्रतिमिनिट वेगाने खाली उतरत असल्याचे सांगण्यात आले.
या अत्यंत गंभीर परिस्थितीत कॅप्टन माछर यांनी सुमारे १४ हजार फूट उंचीवर विमानाचा ताबा मिळवला आणि ते नियंत्रणात आणले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. विमानात एकूण १७४ जण होते. त्यापैकी १६६ इस्रायली नागरिक होते. त्यामुळे माछर यांच्या धाडसामुळे विमानातील प्रवाशांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन Captain Smit Machar नेतान्याहू यांनी या घटनेचा उल्लेख करत माछर यांना नायक म्हणून गौरविले. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमानातील एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकावर चाकूने हल्ला केला आणि सर्व प्रवाशांसह विमान पाडण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. अशा निर्णायक क्षणी कॅप्टन स्मित माछर यांनी विमान कोसळण्यापासून वाचवले. त्यांनी नियंत्रण घेतल्यानंतर क्रू सदस्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडून हल्लेखोर सहवैमानिकाला आवरले. विशेष म्हणजे, आणखी दोन पायलट प्रवासी म्हणून विमानात उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्यांनी विमानाची जबाबदारी स्वीकारली आणि सौदी अरेबियातील तबूक येथे विमान सुरक्षितपणे उतरवले. जखमी वैमानिकांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.कॅप्टन स्मित माछर यांचे वैमानिक म्हणून मुंबईशीही दीर्घकाळाचे नाते आहे. त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ मुंबईतून स्पाइसजेटसाठी बोईंग विमानांचे उड्डाण केले आहे. या काळात त्यांची वरिष्ठ कमांडर आणि त्यानंतर प्रशिक्षण देणारे कॅप्टन म्हणजेच ‘ट्रेनिंग कॅप्टन’ म्हणून पदोन्नती झाली. माछर यांनी वैमानिक प्रशिक्षण गुडगाव येथे घेतले. त्यानंतर २०२२ मध्ये ते दुबईला गेले. घाटकोपरचा हा मुंबईकर आज आपल्या धाडसामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.