मुंबई/ नवी दिल्ली
captain smit machchha दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर भारतीय वैमानिक स्मित माछर यांनी प्रथमच आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. कॉकपिटमध्ये ओमानी को-पायलटसोबत झालेल्या झटापटीत माछर जखमी झाले होते. मात्र, परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि विमानातील सुमारे १८० प्रवाशांसह सर्व क्रू सदस्य सुरक्षित राहिले.
या घटनेनंतर स्मित माछर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. भारतीय सहकारी, सहकर्मचारी, प्रवासी, विमानातील कर्मचारी तसेच जगभरातून संदेश पाठवणाऱ्या नागरिकांनी कठीण प्रसंगी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
‘एक वैमानिक म्हणून मी केवळ माझे कर्तव्य बजावले. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्वजण सुरक्षित आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे,’ असे माछर यांनी आपल्या संदेशात म्हटले. त्यांच्या प्रकृतीबाबतची ही पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया मानली जात आहे.
फ्लायदुबईचे विमान FZ1073 दुबईहून तेल अवीवकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित माछर आणि ओमानी को-पायलट यांच्यात वाद झाला. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक येथे उतरवण्यात आले. फ्लायदुबईने या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तसेच काही प्रवाशांनी दिलेल्या कथित माहितीनुसार, दोन्ही वैमानिकांमध्ये कॉकपिटमध्ये झटापट झाली. या घटनेत को-पायलटकडून स्मित माछर यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी विमानातून ७५०० हा ट्रान्सपॉन्डर कोड पाठवण्यात आला. विमानाचे अपहरण किंवा अन्य बेकायदेशीर हस्तक्षेपाची परिस्थिती दर्शविण्यासाठी हा कोड वापरला जातो.दरम्यान, ओमानी को-पायलट विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी माछर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून दोन्ही वैमानिकांमध्ये झटापट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कॉकपिटमधील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर विमान तबूक येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले.या संपूर्ण प्रकारामुळे विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली होती. मात्र, माछर यांनी परिस्थिती हाताळत विमान सुरक्षितपणे उतरवल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. घटनेदरम्यान जखमी झाल्यानंतरही त्यांनी केलेल्या भूमिकेबद्दल त्यांच्याप्रती कौतुक व्यक्त होत आहे.