नारा टी पॉईंटवर शेतकर्यांचा चक्का जाम

विविध मागण्यांसाठी संतप्त शेतकरी रस्त्यावर

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
कारंजा,
farmers-protestकारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात यावा, वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकर्यांना तात्काळ एक कोटींची आर्थिक मदत करावी यासह अन्य मागण्यांसाठी संतप्त शेतकर्यांनी खा. अमर काळे यांच्या नेतृत्वात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नारा चौरस्त्यावर आज १ रोजी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 

pro
 
२५ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त २६५ तालुक्याच्या यादीत कारंजा तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकर्यांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या. अखेर असंतोषाचे रुपांतरण आंदोलनात झाले. तालुक्यात पाऊस कमी झाल्याने शेतकर्यांचा खर्च धोक्यात आलेला आहे. अपुर्या पावसामुळे उत्पादनाची आशा दिसत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खा. अमर काळे यांनी केला.
 
दरम्यान, आज शेकडो शेतकरी सकाळीच नारा टी पॉईंटवर एकत्रित झाले. कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून ट्रिगर -१ मध्ये समावेश करावा, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबीयांना एक कोटीची मदत आणि तालुक्यातील गोपालकांच्या जनावरांकरिता चारा डेपो सुरू करण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
 
शेतकर्यांनी महामार्गावर ठिय्या देत बराचवेळ रास्ता रोको केला. त्यानंतर नायब तहसीलदार पि. के. आत्राम यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी उपविभागीय अधिकारी विनायक पाटील यांची उपस्थिती होती.