गडचिरोली,
dr-vandana-munghate दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारा संचालित विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वंदना राजू मुनघाटे वयाच्या 58 व्या वर्षी नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाल्या. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त विद्यालयात गौरव समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आचार्य प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य डॉ. लडके, दूधमोचन, बानबले, सौरभ मुनघाटे उपस्थित होते. यावेळी आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांनी डॉ. वंदना मुनघाटे यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा गौरव केला. श्रीमती रंजना चुधरी यांनी त्यांच्यावर स्वलिखित कविता सादर केली. डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी संस्थेशी आपल्या कुटुंबाच्या चार पिढ्यांचा संबंध असल्याचे सांगत संस्थेचा वारसा व संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. डॉ. लडके यांनी त्यांच्या प्राचार्यपदाच्या कार्याचा, तर दूधमोचन यांनी त्यांच्या नियमितपणा व शिस्तीचा गौरव केला. सौरभ मुनघाटे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. डॉ. वंदना मुनघाटे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणी सांगताना सासरे श्रद्धेय गो. ना. मुनघाटे यांच्या प्रेरणा व संस्कारांचा उल्लेख केला. शिक्षकांनी कोणताही वर्ग रिकामा राहू न देता गरजेनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मुख्याध्यापक डोंगरवार, कुमरे, सुमाताई मुनघाटे, खरवडे, दादाजी चुधरी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.