नवी दिल्ली,
Indian pilot Smit Machhar दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील तब्बल १८० इस्रायली प्रवाशांचे प्राण एका भारतीय पायलटमुळे थोडक्यात वाचले आहेत. या विमानाला अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले, ज्यामागे तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामान नसून एक थरारक घटना होती. उड्डाणानंतर काही वेळातच फ्लाईट FZ1073 ने आधी सामान्य आपत्कालीन संकेत असलेला 'स्क्वक कोड 7700' पाठवला आणि काही वेळातच तो अपहरणाचा संकेत असणाऱ्या 'कोड 7500' वर स्विच झाला. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.
इस्रायली मीडियाच्या वृत्तानुसार, या धाडसी भारतीय पायलटचे नाव स्मित मच्छर असून तो फ्लायदुबईचा पायलट आहे. या संकटाच्या सिग्नलमुळे इस्रायलमध्ये प्रचंड घबराट उडाली, ज्यामुळे पंतप्रधान नेतान्याहू यांनी तातडीची बैठक बोलावली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आठ इस्रायली लढाऊ विमानांनी उड्डाण केले. दरम्यानच्या काळात विमान एका मिनिटात १६,००० फूट खाली उतरले, नंतर सौदी अरेबियाकडे वळवून ताबुक या नागरी-लष्करी तळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
यामागील सत्य समोर आले की, विमानाचा भारतीय कॅप्टन आणि ओमानचा सह-वैमानिक यांच्यात झटापट झाली होती. इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते सह-वैमानिक विमान पाडण्याचा प्रयत्न करत होता, ज्याला भारतीय वैमानिकाने रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सह-वैमानिकाने कॉकपिटमध्ये भारतीय कॅप्टनवर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे ते जखमी झाले आणि विमानावरील नियंत्रण सुटले. प्रवाशांमध्ये घबराट पसरल्यानंतर त्यांनी कॉकपिटचा दरवाजा तोडला. सुदैवाने, व्यावसायिक दौऱ्यावर असलेले इतर वैमानिक मदतीला धावले आणि त्यांनी विमानाचे नियंत्रण हातात घेत जवळच्या हवाई तळावर सुरक्षितपणे लँडिंग केले, ज्यामुळे सर्वांचा जीव वाचला. सध्या दोन्ही जखमी वैमानिकांवर उपचार सुरू असून यामागे काही कट होता का, याचा तपास केला जात आहे.