नवेगाव-नागझिर्‍यात मृतावस्थेत आढळला बिबट्या

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा प्राथमीक अंदाज

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
navegaon-nagzira नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या तिरोडा तालुक्यातील सर्रा बिट अंतर्गत येणार्‍या कक्ष क्रमांक १३२ मध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर बिबट्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला असावा असा प्राथमीक अंदाज संबंधित वन्यजीव विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
navegaon-nagzira
 
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी वनरक्षक नियमित नियतक्षेत्रात गस्त घालत असताना कक्ष क्र. १३२ मध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. कर्मचार्‍यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना याची माहिती दिली. घटनास्थळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, मृत बिबट्याच्या अंगावर विविध ठिकाणी खोल जखमांच्या खुणा आढळून आल्या. घटनास्थळाची परिस्थिती पाहता दोन हिंस्र प्राण्यांमध्ये झालेल्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
 
 
एकंदरीत वाघाच्या हल्ल्यात त्या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मनीषा चौहान, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना टेंभरे, मानद वन्यजीव रक्षक नेवारे, जीवशास्त्रज्ञ हर्षद राहांगडाले, पशुवैद्यकीय अधिकारी व आरआरटी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत नियमानुसार मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेहाचे नियमानुसार दहन करण्यात आले. वनविभागाकडून पुढील तपास केला जात आहे.