फ्रँचायझी देण्याचे आमिष; सोलर कंपनीचालकाला १०.६८ लाखांचा गंडा

बनावट कागदपत्रे आणि ई-मेल ; सायबर पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
lured-with-franchise-offer सोलर पॅनेल कंपनीची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील ३० वर्षीय कंपनीचालकाची १० लाख ६८ हजार ७०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. बनावट कागदपत्रे आणि ई-मेलच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आरोपीने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून संपर्क साधत कंपनीचालकाकडून ही रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हिमांशू विजय विश्वकर्मा, (रा. जयप्रकाशनगर, खामला-सोमलवाडा) असे तक्रारदाराचे नाव आहे. विश्वकर्मा सोलर पॅनेलशी संबंधित व्यवसाय चालवतात. त्यांना फ्रँचायझी मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपीने संपर्क साधला.

solar-company 
तक्रारीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून विश्वकर्मा यांच्याशी संपर्क साधला. सोलर व्यवसायाची फ्रँचायझी मिळवून देण्यासाठी नोंदणी शुल्क आणि अन्य प्रक्रियेसाठी पैसे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आरोपीने केलेला प्रस्ताव खरा असल्याचे भासविण्यासाठी काही बनावट कागदपत्रे मोबाइलवर पाठविली, तसेच बनावट ई-मेल आयडीच्या माध्यमातून संवाद साधला. आरोपीच्या बोलण्यावर आणि त्याने पाठविलेल्या कागदपत्रांवर विश्वास ठेवून विश्वकर्मा यांनी वेळोवेळी ऑनलाइन पैसे पाठविले. अशा पद्धतीने त्यांनी आरोपीला एकूण १० लाख ६८ हजार ७०० रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले.
फ्रँचायझी मिळालीच नाही
रक्कम मिळाल्यानंतरही आरोपीने आश्वासन दिलेली फ्रँचायझी दिली नाही. विश्वकर्मा यांनी वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरोपीने पाठविलेली कागदपत्रे आणि फ्रँचायझीची ऑफर बनावट असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बनावट ई-मेल आयडी तपास
पोलिसांकडून आरोपीने वापरलेल्या मोबाइल क्रमांकांची आणि बनावट ई-मेल आयडीची माहिती तपासण्यात येत आहे. तसेच विश्वकर्मा यांनी ऑनलाइन हस्तांतरित केलेली १०.६८ लाख रुपयांची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळविण्यात आली, याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.