सरकारी प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष; नागपूरच्या कंपनीला दोन कोटींचा गंडा

तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
nagpur company सरकारी योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागपुरातील एका कंपनीची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील एका बिझनेस कन्सल्टन्सीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रितू भारत मल्होत्रा (वय ३१), संचालक, इझीस्पिट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

nagpur company
 
तक्रारीनुसार, आरोपींनी रितू मल्होत्रा आणि कंपनीच्या अन्य संचालकांशी संपर्क साधला. सरकारी विभागांमार्फत राबविण्यात येणारे प्रकल्प आपल्या कंपनीला मिळवून देण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांशी संबंधित असल्याचे भासविणारी विविध कागदपत्रेही कंपनीसमोर सादर करण्यात आली. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला सरकारी योजनांमधील विविध प्रकल्प मिळवून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. आरोपींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कंपनीने त्यांना तब्बल दोन कोटी रुपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर आश्वासन दिलेले सरकारी प्रकल्प प्रत्यक्षात मिळालेच नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रकल्पाबाबत ठोस कार्यवाही न झाल्याने कंपनी संचालकांना संशय आला. त्यानंतर कागदपत्रे आणि व्यवहारांची पडताळणी केल्यानंतर फसवणूक झाल्याचा संशय बळावला.
फसवणुकीचे गुन्हे दाखल
रितू मल्होत्रा यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुण्यातील पाथवे बिझनेस कन्सल्टन्सी (चिंचवड) तसेच राहुल गोपालराव सिरसकर (४१, पिंपरी), रोहित दामोदर रानद (४०, पिंपरी-चिंचवड) आणि अंकुश हरिकिसन अग्रवाल (४२, पिंपरी-चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कागदपत्रांचीही तपासणी
सरकारी प्रकल्प मिळवून देण्याच्या नावाखाली कंपनीकडून घेतलेली दोन कोटींची रक्कम नेमकी कुठे वळविण्यात आली, आरोपींनी सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत की बनावट, तसेच सरकारी प्रकल्प मिळवून देण्याबाबत कोणत्या विभागाशी किंवा व्यक्तींशी संपर्क असल्याचे आरोपींनी भासवले, याचा पोलिस तपास सुरू आहे. पोलिस आर्थिक व्यवहारांची तसेच आरोपी आणि कंपनीदरम्यान झालेल्या संवादाचीही तपासणी करीत असून, या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.