कोल्हापूर
Madhuri Elephant नांदणी मठात परतलेल्या माधुरी हत्तीणीच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. माधुरीला जामनगरमधील वनतारा येथे तातडीने पुन्हा स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी PETA इंडियाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ११ ते १२ सप्टेंबरदरम्यान माधुरी नांदणी येथे परतल्यानंतर तिच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजी करण्यात आली होती. मात्र, सध्या माधुरीला साखळदंडाने बांधून एका शेडमध्ये एकाकी ठेवण्यात येत असल्याचा दावा PETA इंडियाने आपल्या अर्जातून केला आहे.
माधुरीच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी नांदणी मठातील परिस्थिती योग्य नसल्याचे तज्ज्ञांनी यापूर्वी मत व्यक्त केल्याचे PETA इंडियाने नमूद केले आहे. याउलट, वनतारा येथे माधुरी आपल्या मैत्रीण शांतीसोबत तुलनेने मुक्त वातावरणात राहत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. वनताराकडून यापूर्वी माधुरीचा व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये ती तेथील परिसरात फिरताना आणि इतर हत्तींसोबत राहताना दिसत होती.
माधुरीला वनतारा येथे हलवल्यानंतर नांदणी मठासह कोल्हापूर परिसरातून त्याला विरोध झाला होता. माधुरीला पुन्हा मठात आणावे, या मागणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोर्चेही काढले. एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या या संघर्षानंतर माधुरीचे नांदणी मठात पुनरागमन झाले. तिच्या आगमनाच्या वेळी हजारो नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करण्यात आली, तर अनेक नागरिक सायंकाळपासूनच तिच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते.
मात्र, आता PETA इंडियाच्या सर्वोच्च न्यायालयातील हस्तक्षेपामुळे माधुरीच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. माधुरीला मठात परत आणण्याची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या १६ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाच्या विरोधात असल्याचा दावा PETA इंडियाने आपल्या अर्जात केला आहे. त्यामुळे माधुरीला पुन्हा वनतारा येथे पाठविण्याच्या मागणीवर आता न्यायालयीन पातळीवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.