मुंबई
maharashtra weathe राज्यातील पावसाळा संपत असतानाच हवामानातील बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचे सांगितले जात आहे. दशकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, मराठवाड्यात १९७२च्या दुष्काळापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ७५ टक्के दुष्काळ जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असतानाच आता वाढत्या तापमानाचे नवे संकट उभे राहिले आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळात राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका जाणवत असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
अमरावतीचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी यासंदर्भात माहिती देताना अमरावतीतील तापमानाने सप्टेंबर महिन्यातील मागील १८ वर्षांचा विक्रम मोडल्याचे सांगितले. शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. सप्टेंबरमध्ये साधारणपणे अमरावतीचे तापमान ३२ ते ३४ अंशांच्या आसपास असते. मात्र, यंदा प्रथमच सप्टेंबरमध्ये तापमान ३६ अंशांवर पोहोचल्याचे बंड यांनी नमूद केले. सकाळपासूनच उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागत आहे.
दरम्यान, ५ ऑक्टोबरनंतर विदर्भातील हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीतील तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे नागरिकांनी बाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
नंदूरबार जिल्ह्यातही ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी उष्णतेचा जोर जाणवला. जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदल यामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये थंडीची चाहूल लागण्याऐवजी नागरिकांना उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तीव्र सूर्यप्रकाशाचा खरीप हंगामातील पिकांवरही परिणाम होत असून, वाढत्या तापमानामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही त्रस्त आहेत. नंदूरबार-गुजरात महामार्गावरील वाहतुकीवरही कडक उन्हाचा परिणाम जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही सप्टेंबरच्या अखेरीस तापमानाने उच्चांक गाठला. बुधवारी शहरातील कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी २६ सप्टेंबर १९८७ रोजी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हा सर्वाधिक तापमानाचा आकडा ठरला आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबरमधील ३० दिवसांपैकी तब्बल २६ दिवस शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ होत गेली आणि ऑक्टोबर सुरू होताच उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. यंदाच्या अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनदरम्यान पावसात घट झाली. त्यातच पावसाने घेतलेली उघडीप आणि वातावरणातील कमी झालेली आर्द्रता यामुळे संभाजीनगरसह राज्यातील काही भागांत ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यामुळे पावसाच्या कमतरतेनंतर आता वाढत्या तापमानाचे आव्हान राज्यासमोर उभे राहिले आहे.