चार वर्षे फ्रीजरमध्ये वडिलांचा मृतदेह ‘पुन्हा जिवंत होतील’

या आशेने क्रायोनिक्सचा प्रयत्न, मालाडमध्ये खळबळ

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
मुंबई
mumbai cryonics case मुंबईतील मालाड परिसरातील कोकणी पाडा येथे एका डे-केअर क्लिनिकमध्ये तब्बल चार वर्षांपासून एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०२२ मध्ये या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. मात्र, भविष्यात वैद्यकीय आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान इतके विकसित होईल की आपल्या वडिलांना पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने कुटुंबीयांनी मृतदेह जतन करून ठेवला होता. पोलिसांना स्थानिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
 

mumbai cryonics case 80-year-old body kept in freezer for 4 years, what is cryonics? 
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार केल्यास ते कायमचे नजरेआड होतील, अशी भावना कुटुंबीयांच्या मनात होती. त्यामुळे मृतदेह जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कुटुंबीयांनी ऑनलाइन माहितीचा शोध घेतला. अमेरिकेत मृतदेह अतिशय कमी तापमानात जतन करण्याची सुविधा देणाऱ्या काही संस्थांची माहिती त्यांना मिळाली होती. मृतदेह अमेरिकेत हलवून क्रायोनिक्स पद्धतीने तो दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने संबंधित संस्थांशी त्यांचा संपर्कही सुरू होता.
क्रायोनिक्स ही मृत व्यक्तीच्या शरीराचे अत्यंत कमी तापमानात जतन करण्याची पद्धत आहे. भविष्यातील वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत्यूनंतर शरीर पुन्हा कार्यान्वित करता येईल, या गृहितकावर या प्रक्रियेचा आधार आहे. पेशी, भ्रूण आणि काही जैविक नमुने अतिशीत तापमानात जतन करण्याची क्रायोप्रिझर्वेशन प्रक्रिया वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रात स्थापित आहे. मात्र, संपूर्ण मानवी मृतदेह क्रायोनिक्सच्या माध्यमातून भविष्यात पुन्हा जिवंत करता येईल, ही संकल्पना अद्याप प्रायोगिक अवस्थेत असून मुख्य प्रवाहातील विज्ञानाने ती सिद्ध केलेली नाही.
मालाडमधील या कुटुंबाने भारतातून मृतदेह अमेरिकेत नेण्याच्या शक्यतेवरही विचार केला होता. क्रायोनिक्सची सुविधा देणाऱ्या अमेरिकेतील संस्थांशी त्यांचा संपर्क सुरू होता. भारतात मृतदेह अशा प्रकारे दीर्घकाळ जतन करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का, याबाबत त्यांनी काही भारतीय वकिलांकडून कायदेशीर सल्लाही घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, हा मृतदेह ज्या क्लिनिकच्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता, त्या ठिकाणच्या व्यवस्थापनालाही याची माहिती देण्यात आली नव्हती. घरमालकाला तर या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती. २०२२ मध्ये घरमालकाने ही जागा क्लिनिक चालवण्यासाठी भाड्याने दिली होती. क्लिनिकमध्ये अशा प्रकारे मृतदेह ठेवण्यात आल्याची आपल्याला माहिती नसल्याचे घरमालकाने पोलिसांना सांगितले. उलट, स्वतः किंवा कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास याच क्लिनिकमध्ये उपचारासाठी जात असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
सोमवारी रात्री स्थानिकांकडून पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी क्लिनिकमध्ये कारवाई केली. त्यानंतर मृतदेह चार वर्षांपासून फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसह क्लिनिक व्यवस्थापन आणि घरमालकाचे जबाब नोंदवले आहेत. मृतदेहावर पुढे अंत्यसंस्कार कशा पद्धतीने केले जाणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून क्लिनिकच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृतदेह जतन करण्यामागील कुटुंबीयांची भावना, क्रायोनिक्सच्या वैज्ञानिक मर्यादा आणि भारतातील मृतदेह जतन करण्यासंदर्भातील कायदेशीर बाबी यामुळे या प्रकरणाने वैद्यकीय विज्ञानासोबतच कायदेशीर क्षेत्रातही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.