‘विदेशी पती’च्या आमिषाने २० लाखांची फसवणूक

गुजरातच्या सात आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
दुबईच्या हवालाकनेक्शनचीही चौकशी
अनिल कांबळे
 
नागपूर,
nagpur-news विदेशी वराशी लग्न लावून देण्याचे आणि लग्नानंतर विदेशात स्थायिक होण्याचे आमिष दाखवून ५० वर्षीय अविवाहित महिलेची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील सात आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात मुंबईतून अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीला बुधवारी गुन्हे शाखेने गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
nagpur-news
 
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयेश अमृतजी ठाकूर (२०), चद्रमाना, पाटण; यशपाल आमसिंह चौहान (२४), बनासकांठा; कुलदीपसिंह विक्रमजी जडेजा (२६), पाटण; राजेंद्रसिंह राणाजी वाघेला (३४), किडाणा, गांधीधाम; नरपत बाबूसिंह (२७), बनासकांठा; उपेंद्र नागजीभाई जोशी (२८), बनासकांठा आणि भानुसिंह जसवंतसिंह वाघेला (२९), वावथरात, गुजरात यांचा समावेश आहे.
 
 
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिलेची मोबाइलवरून एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. आरोपीने काही काळ संवाद साधून तिच्याशी मैत्री वाढवली. आपण भारतात येऊन तिच्याशी लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले. आपण सोन्याचा व्यापारी असून यूकेमध्ये कपड्यांचा मॉल असल्याचेही त्याने भासविले. त्यानंतर आरोपीने आपण महिलेसाठी ७० तोळे सोने आणि ७० हजार अमेरिकन डॉलर घेऊन भारतात येत असल्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याने दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी आपल्याला पकडल्याचे सांगत सामान सोडविण्यासाठी १३ लाख ९२ हजार रुपये भरण्याची मागणी केली. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून आणि अधिक पैशांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. सुरुवातीला ५५ हजार रुपये, त्यानंतर ५ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवून घेण्यात आले. त्यानंतर नागपुरात प्रत्यक्ष भेटून आरोपींनी सुमारे ९ लाख रुपये रोख घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अशा प्रकारे महिलेची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक झाली.
 
तांत्रिक तपासातून गुजरातपर्यंत माग
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाइल क्रमांक, तांत्रिक माहिती आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान गुजरातमधील आरोपींचा सहभाग उघड झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सात जणांना अटक केली. बुधवारी सातही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा पीसीआर सुनावला आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचीही या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी केली जाणार आहे.
दुबईच्या हवाला कनेक्शनचा संशय
या फसवणुकीमागे दुबईशी संबंधित हवाला व्यवहाराचे कनेक्शन आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. फसवणुकीतून मिळालेली रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळविण्यात आली, त्यानंतर ती इतर व्यक्ती किंवा हवाला माध्यमातून परदेशात पाठविण्यात आली का, याची माहिती तपासली जात आहे. या प्रकरणाचे संभाव्य हवाला कनेक्शन आणि आरोपींचे राज्याबाहेरील नेटवर्क लक्षात घेता तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे वर्षभरापासून हे नेटवर्क कार्यरत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून, या टोळीने आणखी किती जणांना अशाच पद्धतीने लक्ष्य केले, याचाही तपास सुरू आहे.