मुंबई
pach futacha bachchan कीर्तनातून लोकप्रिय झालेल्या एका तरुणीची प्रेरणादायी आणि नाट्यमय कहाणी उलगडणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ट्रेलरनेही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘पाच फुटाचा बच्चन’ची कथा एका तरुण कीर्तनकार मुलीभोवती फिरते. कोल्हापुरी भाषेतील तिचे कीर्तन, संतांचे मुखोद्गत असलेले अभंग आणि तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ती अल्पावधीतच जनमानसात लोकप्रिय होते. उंचीने अवघी पाच फूट असली तरी तिच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास आणि तडफेमुळे तिला ‘पाच फुटाचा बच्चन’ अशी ओळख मिळते. या मध्यवर्ती व्यक्तिरेखेतून अभिनेत्री श्रुती मधुदीप मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
सुमारे अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कथानकातील नाट्यमय प्रसंगांची झलक पाहायला मिळते. कीर्तनासारख्या मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेल्या विषयाची आधुनिक आणि मनोरंजक पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. ट्रेलरमधील विविध प्रसंग आणि कलाकारांच्या अभिनयामुळे या कथेत पुढे नेमकी कोणती वळणे येणार, याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘पाच फुटाचा बच्चन’ची कथा यापूर्वी प्रायोगिक एकपात्री नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली होती. त्या नाटकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर त्याचे चित्रपटात रूपांतर करण्यात आले आहे. मराठी प्रेक्षकांच्या भावविश्वाशी नाते सांगणाऱ्या या कथेला मोठ्या पडद्यावर कशा पद्धतीने सादर करण्यात आले आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ट्रेलर लाँचप्रसंगी रितेश देशमुख यांनीही चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. ‘बच्चन’च्या बाजूला उभे राहण्याची कल्पना सहा फुटांचा असो किंवा पाच फुटांचा, आपल्यासाठी काहीशी धाकधुकीची होती, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. महाराष्ट्राची संस्कृती जपतानाच पुरोगामी विचार पुढे नेणारा हा चित्रपट असल्याचे ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवते, असेही त्यांनी नमूद केले. पहिला चित्रपट करताना तो नेमका कसा आकार घेत आहे, याची निर्मात्यांना पूर्ण कल्पना नसते; मात्र प्रेक्षकांची मिळणारी साथ अत्यंत महत्त्वाची असते आणि ती या चित्रपटाला मिळाल्याचे दिसते, असेही रितेश म्हणाले.
राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. श्रुती मधुदीपसोबत गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे हे कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यांनी केले असून सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केले आहे. वेगळे शीर्षक आणि टीजरमुळे आधीच लक्ष वेधून घेतलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथानकातील मनोरंजनासोबतच सामाजिक आणि वैचारिक पैलूंचीही झलक मिळते.
आजच्या तरुणाईच्या विचारविश्वाचा वेध घेतानाच मूल्याधिष्ठित जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कथा असल्याचे ट्रेलरवरून दिसते. नव्या आणि अनुभवी कलाकारांचा समावेश, कीर्तनासारखा सांस्कृतिक विषय आणि नाटकातून चित्रपटात झालेला प्रवास यामुळे ‘पाच फुटाचा बच्चन’विषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.