अंडे प्लास्टिकचे की ताजे? FSSAI ने सांगिलेला प्रयोग करून बघा

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
plastic eggs सोशल मीडियावर सध्या प्लास्टिकची अंडी बाजारात विकली जात असल्याचे दावे करणारे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमुळे ग्राहकांमध्ये अंडी खरेदी करताना भीती आणि संभ्रम निर्माण होतो. मात्र, अंडे प्लास्टिकचे आहे की नाही, याबाबत सोशल मीडियावर केले जाणारे अनेक दावे दिशाभूल करणारे असल्याचे समोर आले आहे.
 
 
plastic eggs
 
 
अंड्यांचा ताजेपणा तपासण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) घरच्या घरी करता येणारी सोपी पद्धत सांगितली आहे. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नसून केवळ पाणी आणि एक खोल भांडे किंवा ग्लास पुरेसा आहे.
अंडे तपासण्यासाठी प्रथम एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामध्ये अंडे अलगद सोडा. अंडे पाण्यात टाकल्यानंतर ते तळाशी जाऊन आडवे राहिल्यास ते ताजे असल्याचे मानले जाते. मात्र, अंडे उभे राहिले किंवा पाण्याच्या पृष्ठभागाकडे तरंगू लागले तर ते जुने झाल्याचे संकेत मिळतात.
अंडे पाण्यावर का तरंगते, यामागेही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अंड्याच्या कवचावर अतिशय सूक्ष्म छिद्रे असतात. वेळ जसजसा जातो, तसतसा अंड्यातील ओलावा या छिद्रांमधून हळूहळू बाहेर पडतो आणि त्याची जागा हवा घेते. त्यामुळे अंड्याच्या आतील हवेची पोकळी वाढते. परिणामी अंड्याचे वजन तुलनेने कमी होते आणि ते पाण्यात तरंगू लागते.
दरम्यान, अंडे फोडल्यानंतर त्यातील पिवळा आणि पांढरा भाग एकमेकांत मिसळला किंवा पसरला तर ते अंडे प्लास्टिकचे असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातो. मात्र, केवळ या कारणावरून अंडे बनावट असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. अंडे जुने होत गेल्यानंतर त्याची आतील रचना आणि टणकपणा कमी होतो. त्यामुळे पिवळा आणि पांढरा भाग पूर्वीप्रमाणे घट्ट न राहता सहज पसरू शकतो.
त्यामुळे अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग मिसळणे हे प्लास्टिकच्या अंड्याचे लक्षण असल्याचे मानणे योग्य नाही. अंडे जुने झाल्यामुळे त्याच्या रचनेत होणारा हा नैसर्गिक बदल असू शकतो. सोशल मीडियावर एखाद्या व्हिडिओमध्ये प्लास्टिकची अंडी असल्याचा दावा पाहिल्यानंतर घाबरून जाण्याऐवजी अंड्याची ताजेपणा तपासण्यासाठी पाण्याची चाचणी करता येते. मात्र, पाण्यात अंडे तरंगणे ही मुख्यतः त्याच्या जुन्या असण्याची खूण आहे; त्यामुळे केवळ या चाचणीवरून अंडे 'प्लास्टिकचे' असल्याचे सिद्ध होत नाही.