वाठोड्यातील एका घरावरील पोस्टरमुळे पोलिसांची नाचक्की !

घरफोडीचा तपास ठप्प; अखेर पोलिसांनाच आरसा दाखवणारे पोस्टर!

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
वाठोड्यातील तक्रारदाराची अनोखी शक्कल
चोरट्यांची माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस जाहीर
 
 
अनिल कांबळे
नागपूर,
Poster on house in Vathoda घरफोडीचा गुन्हा दाखल करूनही चोरट्यांचा मागमूस लागत नसल्याने अखेर एका त्रस्त तक्रारदाराने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पोस्टर आपल्या घराच्या भिंतीवर लावले आहे. ‘घरफोडीबाबत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस’ अशी जाहीर घोषणा करत तक्रारदाराने स्वतःचे दोन मोबाइल क्रमांकही पोस्टरवर दिले आहेत. वाठोडा परिसरातील या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा असून, या प्रकारामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असून वाठोडा पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
 
 
Poster on house in Vathoda
 
वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात १२ जून २०२६ रोजी घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले. घटना लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वाठोडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगितले. घरफोडीचा तपास कुठपर्यंत आला, याची माहिती घेण्यासाठी तक्रारदाराने पोलिस ठाण्यात वारंवार चकरा मारल्या. मात्र, चोरट्यांचा शोध लागला नाही. अखेर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध लागण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी तक्रारदाराने स्वतःच नागरिकांकडे मदतीचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला. त्याने घराच्या भिंतीवर एक पोस्टर लावले. ‘माझ्या घरात १२ जून २०२६ रोजी घरफोडी झाली आहे. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, अद्यापपर्यंत चोरट्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. झालेल्या घरफोडीबाबत कुणीही माहिती दिल्यास त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल,’ असा मजकूर या पोस्टरवर आहे. त्याखाली तक्रारदाराने स्वतःचे दोन मोबाइल क्रमांकही नमूद केले आहेत.
पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह !
घरफोडीसारख्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि संशयित गुन्हेगारांची माहिती यांच्या आधारे तपास पुढे नेला जातो. मात्र, या प्रकरणात तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही आरोपी सापडत नसल्याने वाठोडा पोलिसांच्या तपासाच्या गतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.विशेष म्हणजे, पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असतानाच तक्रारदाराने सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या घरावरच आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केल्याने पोलिस यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत आली आहे. पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असलेल्या तक्रारदाराला अखेर स्वतःच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्याची वेळ का आली? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या घरफोडीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्यात येत आहे. घरफोडीसंदर्भात संशयितांची तपासणी सुरु आहे. या प्रकरणात पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांना लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. तक्रारदाराची अडचण सोडविण्यात येईल.
- नवीनचंद्र रेड्डी (पोलिस सहआयुक्त)