पूर्णेकर हत्या प्रकरणात चौथ्या आरोपीची ओळख पटली

पाचवा आरोपी अद्याप अनोळखी

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
ठाणे
pradeep purnekar ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. हत्येतील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील दबावही वाढला असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी एकूण नऊ पथके तयार केली असून तपासात महत्त्वाची प्रगती झाली आहे. हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पोलिसांनी पटवली असून नितेश पवार असे त्याचे नाव आहे. मात्र, पाचव्या आरोपीने हत्येच्या वेळी हेल्मेट घातल्याने त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
 

pradeep purnekar murder case: fourth accused nitesh pawar identified, fifth still unidentified 
पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत पप्पू शिंदे, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार या चार आरोपींची ओळख पटली आहे. यापैकी पप्पू शिंदे पोलिसांच्या ताब्यात असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या हत्याकांडात एकूण पाच जण सहभागी असल्याचे तपासातून समोर आले आहे. पाचव्या आरोपीचा चेहरा हेल्मेटमुळे स्पष्ट दिसत नसल्याने त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
तपासादरम्यान नितेश पवारने या गुन्ह्यासाठी आपल्या भाच्याच्या वाहनाचा वापर केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांसह इतर संबंधित बाबींचीही माहिती पोलीस गोळा करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी यापूर्वी दोन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले होते. ठाणे युनिट पाचमध्ये या चौघांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. ताब्यातील दोन्ही महिलांची चौकशी महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. या चौघांचा पूर्णेकर हत्याकांडात नेमका काय सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान मीरा रोड परिसरातूनही पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. करिष्मा संतोष कनोजिया, रेणू अच्छेलाल मौर्य, सुनील कुसंता कनोजिया आणि रोशन रामबोध कैरी अशी त्यापैकी नमूद करण्यात आलेली नावे आहेत. हे सर्वजण मानपाडा आणि मनोरमा नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, या चौकशीतून तपासाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आतापर्यंत संतोष मेहिलाल कनोजिया याला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत असून, त्यांना लवकरच ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका आणि हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.