गोंदियात लॉजमधील देह व्यवसायाचा पर्दाफाश

चार पीडित महिलांची सुटका

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई
 
गोंदिया,
gondia शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राधिका लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून चार पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत लॉजचा चालक-मालक जगदिश भामनानी (५४), रा. हेमू कॉलनी, यादव चौक, गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ११.३० वाजतानंतर करण्यात आली.
 
 
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका लॉजमध्ये अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पंचांसह लॉजवर छापा टाकला. यावेळी चार महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित महिलांची सुटका करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी लॉजचा चालक-मालक जगदिश भामनानी याच्या विरोधात गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कलम १४३(२)(३) बीएनएस तसेच सहकलम ३, ४ व ५ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीषा निकम, सहाय्यक फौजदार जितेंद्र मिश्रा, पोलिस हवालदार बलराज लांजेवार, पोलिस हवालदार रूपेश सुखदेवे, महिला पोलिस हवालदार शिल्पा बडवाईक, पोलिस शिपाई रविंद्रकुमार मेश्राम, महिला पोलिस शिपाई मंजु बागडे व चालक महिला पोलिस शिपाई सुरेखा मेंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.