मुंबई
ranvir shorey अभिनेता रणवीर शौरी आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका पूजा भट्ट यांच्या सुमारे दोन दशकांपूर्वीच्या नात्याशी संबंधित वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पूजाचा भाऊ राहुल भट्ट याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत २००२ मध्ये रणवीर शौरीसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत भाष्य केले. त्यावेळी आपण अतिप्रमाणात संतापलो होतो आणि कायदा हातात घेणे चुकीचे होते, अशी स्पष्ट कबुली राहुलने दिली. त्याच्या या वक्तव्यानंतर रणवीर शौरीनेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत गेल्या दोन दशकांपासून आपल्याबाबत केल्या जात असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
आरजे सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये राहुल भट्टने २००२ मधील त्या घटनेची आठवण सांगितली. पूजा भट्ट आणि रणवीर शौरी यांच्यात वाद झाल्यानंतर रणवीरने पूजावर हात उचलल्याचा दावा राहुलने केला. त्यानंतर आपण या वादात हस्तक्षेप केला, असे त्याने सांगितले. मात्र, त्या वेळी आपली प्रतिक्रिया गरजेपेक्षा अधिक तीव्र होती, हेही राहुलने मान्य केले. त्याने रणवीरच्या गाडीची काच फोडल्याचे तसेच त्याच्या एका बरगडीला दुखापत झाल्याचे सांगितले.
या घटनेप्रकरणी राहुलला अटक करण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. अनेक वर्षांनंतर त्या प्रसंगाकडे मागे वळून पाहताना आपली कृती चुकीची होती, अशी भूमिका राहुलने मांडली. त्याबद्दल पश्चात्ताप असल्याचेही त्याने सांगितले. तसेच, पुढे हे प्रकरण कायदेशीररीत्या मिटवताना रणवीरने संयम दाखवला, असेही राहुलने नमूद केले. आर्थिक भरपाईची मागणी न करता रणवीरने प्रकरण संपवण्यास सहमती दर्शवली होती, असा दावा राहुलने केला. रणवीरच्या या भूमिकेबद्दल त्याने आदरही व्यक्त केला.
राहुल भट्टच्या या वक्तव्यानंतर रणवीर शौरीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. गेल्या २० वर्षांपासून आपल्याविरोधात सुरू असलेल्या ‘प्रचार आणि बदनामी’ला आता काही प्रमाणात सत्याची जागा मिळाली असल्याचे त्याने उपरोधिक शब्दांत म्हटले. त्याचवेळी रणवीरने स्वतःची बाजू मांडताना हिंसाचारापासून स्वतःचा बचाव करणे किंवा एखाद्या विषारी परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ समोरच्या व्यक्तीवर हात उचलणे असा होत नाही, असे स्पष्ट केले. रणवीरच्या या प्रतिक्रियेमुळे या जुन्या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे दावे पुन्हा चर्चेत आले आहेत.
रणवीर शौरी आणि पूजा भट्ट यांचे नाते २०००च्या दशकाच्या सुरुवातीला चर्चेचा विषय ठरले होते. दोघांनी ‘जिस्म’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. मात्र, सुमारे दोन वर्षांतच त्यांचे नाते संपुष्टात आले. २००२ मध्ये ब्रेकअपनंतर या वादाला मोठे स्वरूप आले आणि त्यानंतर मारहाणीची घटना चर्चेत आली.
आता तब्बल दोन दशकांनंतर राहुल भट्टने त्या घटनेतील स्वतःच्या भूमिकेबाबत केलेल्या कबुलीमुळे हा जुना वाद पुन्हा समोर आला आहे. त्याचवेळी रणवीर शौरीच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मांडल्या जात असलेल्या दाव्यांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.