सहकार भारतीचे शिर्डीत नारीशक्ती सहकारिता संमेलन

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
वर्धा,
sahakar-bharati सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने शिर्डी येथे ३ व ४ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय नारीशक्ती सहकारिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाला मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बाल कल्याण विकास मंत्री मेघना बोर्डीकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
या संमेलनामध्ये सहकार क्षेत्रात कार्यरत विविध सहकारी संस्थांच्या २ हजारांहून अधिक महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, त्या प्रशिक्षित व्हाव्यात व येणाऱ्या काळात सहकारी संस्थांमध्ये त्यांचे सक्षम नेतृत्व निर्माण होण्याच्या उद्देशाने या संमेलनात विविध विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन सुद्धा उपस्थितांना दोन दिवसांच्या विविध सत्रांमध्ये होणार आहे.
 
२०२१ मध्ये केंद्रात सहकाराचे स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर या क्षेत्राला आता अधिक ऊर्जा मिळत आहे. देशभरातील ६.५० लाख सहकारी संस्थांपैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये २.५० लाखांहून अधिक सहकारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील १३ कोटींपैकी लोकसंख्येच्या ८ कोटींच्यावर लोक सहकाराशी जोडल्या गेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाला अधिक वाव मिळण्याच्या अनुषंगाने सहकार भारतीने हे संमेलन शिर्डी येथे आयोजित केले आहे.
 
 
पुढीलवर्षी सहकार भारती सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या सुवर्ण महोत्सवी काळामध्ये महिलांच्या नेतृत्वास अधिक वाव मिळावा या दृष्टीने संघटना प्रयत्नशील आहे. या संमेलनाच्या माध्यमातून हजारो महिलांचे नवे नेतृत्व या सहकार क्षेत्राला मिळेल, अशी आशा विवेक जुगादे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोळसे, श्याम खत्री, मनोज पाचखेडे, प्रशांत मुळे, भास्कर थोटे, सुनील पारसे, मंजिरी देशकर यांनी केले आहे.