वर्धा
dr-pankaj-bhoyar-wardha पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या प्रयत्नांमुळे विदर्भातील राज्य राखीव पोलीस बलाच्या सर्व गटांसाठी वर्धा येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गृह विभागाने 1 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी चालना मिळणार असून वर्धेसारख्या ऐतिहासिक भूमीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.
या प्रशिक्षण केंद्रासाठी सुमारे 200 एकर जागा उपलब्ध असून, जिल्हाधिका-यांनी जागा हस्तांतरणास तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्रासाठी अंदाजे 34.07 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्राकरिता 26.84 कोटी इतका आवर्ती खर्च व 7.23 कोटी अनावर्ति खर्च आहे. त्यामध्ये 446 पदांची निर्मिती होणार आहे. यामध्ये अ संवर्गातील 53 पदे, गट ब मधील 18, गट क 221, गट ड मधील 130, कंत्राटी व बाह्ययंत्राणेव्दारे 24 पदांचा समावेश आहे. याशिवाय वाहने, प्रशिक्षण साहित्य व इतर आवश्यक सुविधांचा समावेश आहे.
विदर्भात मिळणार सुविधा
या निर्णयामुळे विदर्भातील राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना व अधिका-यांना वर्धेसारख्या शहरात आधुनिक व दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या नानवीज (दौंड) येथे एकमेव प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात नवीन केंद्राची आवश्यकता निर्माण झाली होती. दौंड येथील प्रशिक्षण केंद्रावरील वाढता भार लक्षात घेत गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी वर्धा येथे राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न आरंभिले होते. त्यांच्या प्रयत्नामुळे आज केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांच्या प्रयत्नांमुळे वर्धा येथे लघु वैद्यक न्याय प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. गृह राज्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने वर्धा पोलिस दलात व्यापक बदल होत असून नवीन सुविधा मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
वर्धा येथे राज्य राखीव दलाचे प्रशिक्षक केंद्र व्हावे, अशी इच्दा होती. त्यादृष्टिने प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे वर्धेत प्रशिक्षण केंद्र स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिल्यामुळे विदर्भातील पोलीस प्रशिक्षण व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असल्याचे डॉ. भोयर यांनी म्हटले आहे. प्रशिक्षण केंद्रामुळे वर्धा जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण क्षमतेत वाढ होऊन पोलीस दल अधिक सक्षम आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.