मालेगाव,
woman-goes-missing-from-medshi मालेगाव तालुयातील मेडशी येथून रुग्णालयात जाऊन येते, असे सांगून घराबाहेर पडलेली ३८ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचे गैरकायदेशीररीत्या अपहरण करून तिला डांबून ठेवले असावे, असा संशय व्यक्त करत तिच्या पतीने मालेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून महिलेचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जावेद जुम्मु बेनीवाले वय ४२, राहणार गवळीपुरा, मेडशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी अतिया जावेद बेनीवाले वय ३८ ह्या मंगळवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास रुग्णालयात जाऊन येते, असे सांगून घरातून निघाल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे पतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीत जावेद बेनीवाले यांनी पातूर येथील जमादार प्लॉट परिसरातील फुरकान शहा अकबर शहा याने त्यांच्या पत्नीचे गैरकायदेशीररीत्या अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. मालेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निलेश अहीर करीत असून पोलिसाकडून बेपत्ता महिलेचा शोध घेण्यात येत आहे.