मालेगाव,
youth-swindled-of-10-lakh-in-shirpur तालुयातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वस्त दरात सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चौघांनी संगनमत करून तरुणाचा विश्वास संपादन केला आणि खरे सोने देण्याऐवजी बनावट पिवळ्या धातूच्या गिन्न्या देऊन त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेशकुमार हिंदाराम वय २५ हे मूळचे राजस्थानमधील जालोर येथील असून सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून कमी किमतीत सोन्याच्या गिन्न्या उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे फिर्यादीचा आरोपींवर विश्वास बसला. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता दिलीप नावाचा व्यक्ती, राजू नावाचा व्यक्ती तसेच अन्य दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीला शिरपूर येथील टीव्हीएस शोरूमजवळ बोलावून घेतले. सोन्याच्या गिन्न्या देण्याच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर खर्या सोन्याऐवजी बनावट पिवळ्या धातूच्या गिन्न्या त्यांच्या हातात देण्यात आल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दिलीप, राजू आणि अन्य दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक योगिता भारद्वाज करीत आहेत.