नवी दिल्ली
abhijit dipke मुंबईहून दिल्लीला पोहोचताच ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातच ताब्यात घेतले. सौरभ दास आणि आशुतोष रांका अशी या सहकाऱ्यांची नावे आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांचे पथक थेट विमानात दाखल झाले आणि त्यांनी तिघांनाही ताब्यात घेतले. जंतर-मंतर येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान दिल्ली विमानतळावर उतरताच पोलिसांनी आत प्रवेश केला. तिघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी विमानातूनच त्यांना ताब्यात घेतले. सीजेपीला आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षाला जंतर-मंतर येथे निदर्शने करता येणार नाहीत, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केली.
या कारवाईदरम्यान अभिजीत दिपके यांनी पोलिसांना, ‘मी येथे अटक होण्यासाठी आलो आहे. मला अटक करा,’ असे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यावर पोलिसांनी, ‘ही अटक नाही. कृपया सहकार्य करा,’ असे उत्तर दिले. या संवादामुळे विमानतळावरील कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या (एसआयआर) आणि मुख्य निवडणूक abhijit dipke आयुक्तांच्या (सीईसी) विरोधात दिल्लीमध्ये आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीने जंतर-मंतर येथे निदर्शने करण्याची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, आंदोलनासाठी येणाऱ्या लोकांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले जात आहे.वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत दिल्लीत १,५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हे आंदोलक शहरातील वेगवेगळ्या भागांतून ताब्यात घेण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, निमलष्करी दलाच्या २२१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील ४५ मेट्रो स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. जंतर-मंतर परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी रस्त्यांवर खिळेही लावण्यात आले आहेत. याशिवाय, दिल्लीला येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनाचा परिणाम केवळ राजकीय घडामोडींपुरता मर्यादित न राहता शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही झाल्याचे चित्र आहे.
सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असल्याने राजधानीतील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. जंतर-मंतर परिसरातील कडेकोट बंदोबस्त आणि मोठ्या प्रमाणावरील पोलिसी कारवाईमुळे या आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागले आहे.