अभिजीत दीपकेंवर दुःखाचा डोंगर

पोलिसांच्या ताब्यात असतानाच आजीचे निधन

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
हिंगोली
abhijit dipke कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अभिजीत दीपके दिल्लीतील आंदोलनासाठी रवाना झाले असताना त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत यांच्या आजीचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी दीर्घ आजाराने निधन झाले. दुसरीकडे, दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अभिजीत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे दीपके कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
 

abhijit dipke grandmother dies as cockroach janata party leader is detained in delhi 
अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वयोमान आणि दीर्घ आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांचे निधन झाले. आजीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अभिजीत यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आहे. आजीच्या निधनानंतर दोघेही तातडीने हिंगोलीकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली विमानतळावर अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि कथित निवडणूक गैरव्यवहारांच्या निषेधार्थ सीजेपीकडून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजीत दीपके मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. मात्र, दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे, याबाबत पोलिसांकडून स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचे वृत्त आहे.अभिजीत पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना आजीच्या निधनाची बातमी समजली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना कुटुंबीयांकडे जाण्याची संधी मिळणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
आजीची शेवटची भेट झाल्याची चर्चा
अभिजीत दीपके गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत असल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात आंदोलनासाठी ते मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी प्रामुख्याने फोनवरून संपर्क असल्याचे सांगितले जाते. छत्रपती संभाजीनगर येथे असताना त्यांनी आजीची शेवटची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर मुंबईत आल्यापासून त्यांचा आजीशी संपर्क झाला नव्हता, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.आंदोलनासाठी दिल्लीला गेलेल्या अभिजीत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असतानाच आजीच्या निधनाची दुःखद बातमी समोर आल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीत अभिजीत यांना कुटुंबीयांपर्यंत पोहोचता येणार का, याबाबत पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.