डिव्हिलियर्सच्या वादळात ऑस्ट्रेलिया गारद

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
पर्थ
Australia caught in the De Villiers storm क्रिकेटच्या मैदानावर एबी डिव्हिलियर्सची जादू आजही कायम असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या या धडाकेबाज फलंदाजाने आपल्या आक्रमक खेळीने चाहत्यांना थक्क केलं. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सविरुद्ध खेळताना डिव्हिलियर्सने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्याच्या या वादळी कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सने २१० धावांचं लक्ष्य अवघ्या १५.४ षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केलं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सने पाच गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावा उभारल्या होत्या; मात्र डिव्हिलियर्सच्या तुफानी फलंदाजीसमोर त्यांची ही धावसंख्या अपुरी ठरली.
 
 
 
ab
 
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात फॅफ डु प्लेसिसच्या रूपाने पहिला धक्का बसला. केन रिचर्डसनने त्याला अवघ्या पाच धावांवर बाद केलं. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने मैदानावर आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ४० चेंडूंत सहा चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने नाबाद १११ धावा ठोकल्या. दुसऱ्या बाजूने रिचर्ड लेव्हीनेही २९ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून १२७ धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेचा विजय जवळपास निश्चित केला. लेव्ही बाद झाल्यानंतर जेपी ड्युमिनीने डिव्हिलियर्सला साथ दिली आणि संघाला विजय मिळवून दिला.
 
 
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सकडून डार्सी शॉर्ट आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा पाया रचला. उस्मान ख्वाजा अवघ्या नऊ धावा करून बाद झाल्यानंतर शॉर्ट आणि वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. शॉर्टने २५ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांसह ६६ धावा केल्या, तर वॉर्नरने ३७ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. जो बर्न्सने २५ चेंडूंत नाबाद २८ धावा, तर जोनाथन वेल्सने १२ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह २३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करूनही डिव्हिलियर्सच्या नाबाद शतकाने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं आणि दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सने दणदणीत विजय नोंदवला.