नवी दिल्ली
delhi police action before कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, १५ही जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे ३० ते ४० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आंदोलनासाठी इतरांना प्रवृत्त करू शकणाऱ्या काही व्यक्तींच्या घरांबाहेरही पोलिसांकडून निगराणी ठेवण्यात येत आहे.
CJPकडून आज जंतर-मंतर येथे मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. आंदोलनासाठी लोकांना एकत्र करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवरही पोलिसांची विशेष नजर आहे.
दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) सुमारे २५ हजार जवानांना राजधानीतील विविध भागांत तैनात करण्यात आले आहे. दिल्लीची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मेट्रो व्यवस्थेवरही सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले असून, ४५ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. राजधानीच्या सीमांवर, रेल्वे स्थानकांवर, बस टर्मिनल्स तसेच इतर संवेदनशील ठिकाणीही सुरक्षा आणि निगराणी वाढविण्यात आली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारताना दिल्ली पोलिसांनी संबंधित पत्र हे केवळ आंदोलनाची माहिती देणारे होते, असे स्पष्ट केले. नियमानुसार आंदोलनासाठी परवानगी मागणारा अर्ज सादर करण्यात आलेला नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. मोठ्या संख्येने लोक जंतर-मंतर येथे जमण्याची शक्यता असल्याने, विनापरवानगी जमाव होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त आणि निगराणी वाढविण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेत दिल्ली पोलिसांना मदत करण्यासाठी CAPFच्या कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली जिल्ह्याची २० विभागांत विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक भागावर संयुक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. विविध पथकांचे नेतृत्व करणारे विशेष पोलीस आयुक्तही संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेच्या आडून मतदार यादीत फेरफार केल्याचा तसेच मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’मध्ये बदल करण्यासाठी दोन सहकारी निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर CJPकडून त्यांच्या विरोधात आंदोलन प्रस्तावित करण्यात आले आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने व्यापक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत.