नवी दिल्ली
Delhi police tighten security मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रस्तावित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. शनिवारी सुमारे सात हजार आंदोलक दिल्लीत दाखल होण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली आहे. संभाव्य गर्दी आणि आंदोलनादरम्यान उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना अत्यंत संयमाने आणि व्यावसायिक पद्धतीने परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आंदोलनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ब्रीफिंगमध्ये पोलिसांना आंदोलकांच्या चिथावणीखोर कृतींना प्रतिसाद न देण्याचे आणि संपूर्ण कारवाईदरम्यान शांतता राखण्याचे निर्देश देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवताना अनावश्यक संघर्ष टाळण्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भर दिला आहे.
दरम्यान, कोणत्याही अनधिकृत जमावाला परवानगी दिली जाणार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन निश्चित केलेल्या कोठडी केंद्रांमध्ये पाठविण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. स्वतःला स्वतंत्र पत्रकार म्हणवणाऱ्या व्यक्तींनी पोलिसांना चिथावणी देण्याचा किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आंदोलकांना रामलीला मैदानावर नेण्याच्या शक्यतेबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. या मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अद्याप कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडे औपचारिक अर्ज सादर केल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. संपूर्ण बंदोबस्तादरम्यान पोलीस दलाने शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने काम करावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहणार असून, गरजेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी Delhi police tighten security सकाळी सहा वाजल्यापासूनच दिल्लीमध्ये वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. राजधानीतील विविध भागांत मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या असून, राष्ट्रीय राजधानीतील काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवाही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.दिल्ली वाहतूक पोलिसांनी मध्य दिल्लीतील कनॉट प्लेस, मंडी हाऊस, जंतर-मंतर, पटेल चौक यांसह प्रमुख चौक आणि रस्त्यांच्या परिसरात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असून, परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत.