धुळे
dhule shocking incident शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीत नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांच्याही पायांना लोखंडी साखळीने बांधून त्याला कुलूप लावण्यात आले होते. श्याम हरी पाटील (वय २८) आणि सपना पाटील (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनी प्रेमविवाह केला होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम आणि सपना हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील रहिवासी होते. सध्या ते एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे राहत होते. सावळदे गावाजवळील तापी नदीत दोन मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोन्ही मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, दोघांच्याही पायांना लोखंडी साखळी गुंडाळून कुलूप लावल्याचे आढळून आले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास नरडाणा पोलीस सर्व शक्यतांच्या आधारे करीत आहेत.
दरम्यान, सावळदे येथील तापीdhule shocking incident नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हा पूल आत्महत्यांचे ठिकाण बनत असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या पुलावर तातडीने उंच लोखंडी जाळ्या किंवा संरक्षक कुंपण उभारावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि सुरक्षारक्षक तैनात करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.