उपकालवा फुटल्याने शेतात शिरले पाणी

शेतकऱ्याचे सोयाबीन पीक उद्ध्वस्त

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
तिवसा
distributary-canal-breaches शेतकऱ्यांच्या शेतांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या उद्देशाने सोडण्यात आलेल्या कालव्याचे पाणीच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे कारण ठरल्याची घटना समोर आली आहे. भांबोरा-अहमदाबाद उपकालवा फुटल्याने अहमदाबाद येथील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे कापणी करून गंजी लावून ठेवलेले सोयाबीन पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
 

tivasa
अहमदाबाद येथील अहमदाबाद परिसरात सारिका बाळू चव्हाण यांची शेती आहे. मागील वर्षापासून अहमदाबाद येथील शेतकरी अतुल गावंडे हे या शेतीचे वाहितदार म्हणून देखभाल करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी शेतातील सोयाबीनची कापणी करून त्याच्या गंजी लावून ठेवल्या होत्या. पीक कापणीनंतर सोयाबीन सुरक्षित ठेवण्याची तयारी सुरू असतानाच कालव्याच्या पाण्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. शनिवारी रात्रीच्या सुमारास भांबोरा-अहमदाबाद उपकालवा फुटल्याने कालव्यातील पाणी थेट शेतात शिरले. काही वेळातच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पाण्याने पूर्णपणे चिंब झाल्या. शेतात इतके पाणी साचले आहे की, त्या ठिकाणी जाणेही कठीण झाले आहे. कालव्यातून वाहून आलेले पाणी शेतातून पुढे डेहनी नदीच्या दिशेने वाहून गेले आहे, तरी शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने परिस्थिती अद्यापही बिकट आहे. खरीप हंगामातील सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. पावसाची अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीतील मेहनत यांचा सामना करून शेतकरी पीक हातात येण्याची वाट पाहत असतो. अशातच कापणी पूर्ण झाल्यानंतर शेतात ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पाण्याखाली भिजल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
 
शेतकरी अतुल गावंडे यांच्या दीड एकर शेतात सोयाबीनचे पीक घेण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच सोयाबीन सोंगून त्याच्या गंजी शेतात लावून ठेवल्या होत्या. मात्र, शनिवारी रात्री भारसवाडी वितरिका फुटल्याने संपूर्ण शेतात पाणी शिरले. यामुळे अंदाजे दहा क्विंटल सोयाबीनचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे शेताची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
 
वितरिका फुटल्याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी पी. डी. सोळंके, सचिन इंगोले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आणि फुटलेल्या मायनरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. भारसवाडी वितरिकेचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे.