मालेगाव,
navdurga-festival-in-malegaon-city महान नवरात्रोत्सवाचे वेध आता संपूर्ण मालेगाव शहरासह परिसरात लागले असून, येत्या ११ ऑटोबर पासून या आदिशक्तीच्या उत्सवाला अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ होत आहे. यंदा मालेगाव शहरात तब्बल २२ सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने दुर्गादेवीची स्थापना करून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवासाठी मालेगाव शहरातील भाविक, विशेषतः महिला व तरुण वर्गात प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणी, आकर्षक रोषणाई आणि मूर्ती आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी पूर्ण झाली असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि अंबेमातेच्या जयघोषात आदिशक्तीचे करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. सनातन धर्मात नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्र म्हणजे केवळ सण नसून, ती वाईटावर चांगल्याच्या विजयाची (अधर्म नष्ट करून धर्माची स्थापना) नांदी मानली जाते. महिषासुर या राक्षसाचा संहार करण्यासाठी आदिशक्तीने नऊ वेगवेगळी रूपे धारण करून नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी (विजयादशमी) त्याचा पराभव केला.
त्यामुळे या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची (शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री) विशेष पूजा-अर्चा केली जाते. उपवास, घटस्थापना, गरबा-दांडिया आणि ललिता पंचमी, महाअष्टमीचे पूजन करतात. देवीला मानणारे भाविक केवळ परंपरेचा भाग म्हणून नव्हे, तर अतिशय मनोभावे आणि निस्सीम श्रद्धेतून हा उत्सव साजरा करतात. मंडळांच्या वतीने नऊ दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मालेगाव शहरात भक्तीचा व चैतन्याचा महापूर वाहणार असल्याचे चित्र दिसत आहे.