अंजनगाव सुर्जी
finance-company दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला मोतीलाल ओसवाल होम लोन फायनान्स कंपनीने मुलाबाळांसह बेघर केले आहे. खोडगाव येथील विवेक दुर्योधन रामेकर यांच्या घराला बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता अधिकाऱ्यांनी सील ठोकून कुलूप लावल्याने वृद्ध आई व लहान मुलांसह संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे.
विवेक रामेकर यांनी सन २०१८ मध्ये २ लाख ५७ हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. मासिक हप्ता ४ हजार रुपये होता. आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तरीही कंपनीकडून व्याजासह ३ लाख ९४ हजार २७४ रुपये थकबाकी सांगून संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय सील काढणार नाही, अशी अडवणूक करण्यात आली. आर्थिक अडचणीत असलेल्या रामेकर कुटुंबासाठी संपूर्ण खोडगाव धावून आले. ग्रामस्थांनी तात्काळ २० हजार रुपये जमा करून देण्याची तयारी दाखविली व काही दिवसांची मुदत द्यावी अशी कळकळीची विनंती अधिकाऱ्यांना केली. मात्र मानवता दाखवण्याऐवजी अधिकाऱ्यांनी घराला सील ठोकलेच, असा आरोप सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच अतुल खारोडे, माजी उपसरपंच शुभम वाघ, माजी सैनिक गजानन पायघन यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.
या अमानुष प्रकाराची आमदार गजानन लवटे यांनी गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यात एका गरीब कुटुंबाला बेघर करणे हे अत्यंत निंदनीय असून मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून विवेक रामेकर कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा, अशा सूचना आमदार लवटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्महत्या करू, असा गंभीर इशारा रामेकर कुटुंबीयांनी प्रशासनाला दिला आहे.
कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई
-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील भूमीहीन शेतमजूर विवेक रामेकर च्या घराला सील लावल्या प्रकरणी मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीचे कलेक्शन मॅनेजर चेतन घुरडे तसेच कंपनीचे लीगल अधिवक्ता मनीष शर्मा यांनी सांगितले की, मुख्य ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अमरावती कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आहे.