अंबा व एकवीरा देवीच्या दर्शनाची ओढ

जिल्ह्यात २,५८३ मंडळे करणार देवीची स्थापना

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
अमरावती
goddesses-amba-and-ekvira जिल्ह्यात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. विदर्भाची कुलस्वामिनी अंबा व एकवीरा देवीच्या दर्शनाची ओढ भक्तांना लागली आहे. शिवाय अमरावती शहर हद्दीत सुमारे ५८५ सार्वजनिक मंडळे दुर्गा व शारदादेवी मूर्तींची स्थापना करणार असून, ६९ ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस जिल्ह्यात १,७०९ दुर्गादेवी आणि २८९ शारदादेवींची मंडळे आहेत. यामध्ये ‘एक गाव, एक दुर्गा’ उपक्रमातील ३९५ आणि ‘एक गाव, एक शारदा’ उपक्रमातील ९६ मंडळे आहेत. अशाप्रकारे शहर व ग्रामीण भागात मिळून सुमारे २,५८३ मंडळे देवीची स्थापना करणार आहे.
 
amba
हजारो पोलिस कर्मचारी तैनात
नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी ३ पोलिस उपायुक्त, ४ सहायक पोलिस आयुक्त, २८ पोलिस निरीक्षक, ७० सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि १,६५० पोलिस अंमलदारांसह एक एसआरपीएफ कंपनी, आरसीपी, क्युआरटी आणि ५०० पुरुष व महिला होमगार्डचा बंदोबस्त राहणार आहे. महिला सुरक्षेसाठी १० दामिनी पथके आणि १४ सीआर मोबाईल कार्यरत राहतील.
 
ग्रामीण भागात एक अपर पोलिस अधीक्षक, सात उपविभागीय पोलिस अधिकारी, २० पोलिस निरीक्षक, ११७ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि १,७०० पोलिस अंमलदार तैनात राहतील. शिवाय ३ दंगल नियंत्रण पथके, एक जलद प्रतिसाद पथक, एक एसआरपीएफ कंपनी, ८८० पुरुष व महिला होमगार्ड आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी २० पोलिस अंमलदार नियुक्त करण्यात आले आहे.
 
जिल्ह्यात २,५८३ मंडळे करणार देवीची स्थापना
संवेदनशील ठिकाणे सीसीटीव्ही आणि ग्रामीण भागात ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. सायबर पथक सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट व अफवांवर लक्ष ठेवणार आहे. ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करावे, आक्षेपार्ह संदेश प्रसारित करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त राकेश ओला व ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून नवरात्रोत्सव शांततेत साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.