स्थानिक गुन्हे शाखा व डुग्गीपार पोलिसांची कारवाई
गोंदिया,
murder-solved-through-dna-report घरात एकट्या असलेल्या ८१ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना १ व २ सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव (राका) येथे उघडकीस आली होती. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा व डुग्गीपार पोलिसांनी उलगडा केला असून घटनास्थळी मिळालेल्या चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यांच्या डीएनए तपासणीतून आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे. मृत महिलेच्या घराशेजारी राहणारा विलास किशन मेश्राम (४२) या युवकानेच तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली आहे.

पळसगाव (राका) येथील कुसुमबाई चैतराम कापगते (आजीबाई) (८१) या १ ते २ सप्टेंबरच्या मध्यरात्री घरात एकट्या असताना अज्ञात आरोपीने त्यांचा खून करून त्यांच्या अंगावरील दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याची अंगठी आणि सोन्याचे मणी असलेली काळी पोत, असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पराग परमानंद कापगते यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हलविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डुग्गीपार पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
तपासात घटनास्थळी मृत महिलेच्या अंगावर चघळलेल्या सुपारीचे तुकडे आढळले असता पोलिसांनी ते जप्त करून डीएनए तपासणीसाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूर येथे पाठविले. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती, बोटांचे ठसे, श्वानपथक आणि मोबाईल डेटाचे विश्लेषण करूनही सुरुवातीला ठोस धागा मिळात नव्हता. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे तपासाला दिशा दिली. कुसूमबाईच्या परिचयातील आणि तिच्या दैनंदिन हालचालींची माहिती असलेल्या व्यक्तीवर संशय केंद्रित करून गावातील चार संशयितांचे रक्तनमुने डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आले.
विशेष पथकाने गावातील संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. यावेळी विलास मेश्राम हा आर्थिक अडचणीत असून कर्जबाजारी असल्याची माहिती पुढे आली. घटनेनंतर त्याने मध्यस्थांमार्फत सडक-अर्जुनी, सौंदड आणि भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील सराफा व्यावसायिकांशी वारंवार संपर्क साधल्याचेही तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतून प्राप्त डीएनए अहवालात घटनास्थळी मिळालेल्या चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यांतील डीएनए आणि विलास मेश्राम याचा डीएनए जुळून आला. याआधारे शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी कुसूमबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यासाठी तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली असून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.