नाशिक
nashik health scam कोरोना काळात मृत्यू झालेल्या 22 रुग्णांवर तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा उपचार केल्याचे कागदोपत्री दाखवून शासकीय निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कथित बनावट क्लेम दाखल करून सुमारे 2 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिकमधील तीन नामांकित रुग्णालयांच्या संचालकांविरोधात मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या 22 रुग्णांच्या नावाने सहा वर्षांनंतर उपचार घेतल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित रुग्ण जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावावर शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत बनावट दावे सादर करण्यात आले. यासाठी वैद्यकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाकडून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी मिळवल्याचा आरोप संबंधित रुग्णालयांवर आहे.हा गंभीर प्रकार विधानमंडळाच्या अधिवेशनात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उपस्थित केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली. हे पथक संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्रपणे आणि सखोल चौकशी करत आहे.मृत रुग्णांच्या नावावर कथित बनावट क्लेम दाखल करून सरकारी निधी मिळवण्यात केवळ रुग्णालय प्रशासनाचा सहभाग होता की यामागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत होते, याचा तपास एसआयटीकडून केला जात आहे.
या प्रकरणात आरोग्य विभाग तसेच शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपास पुढे गेल्यानंतर आणखी काही रुग्णालये, अधिकारी आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.आता एसआयटीच्या तपासातून या कथित घोटाळ्यामागे नेमके कोण आहेत आणि शासकीय निधी लाटण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला, याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.