फ्लाय दुबईतील हल्ल्याची NIA कडून चौकशी

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
NIA to probe Flydubai incident फ्लाय दुबईच्या FZ1073 या विमानाच्या कॉकपिटमध्ये ३० सप्टेंबर रोजी भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. शनिवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या निर्देशानंतर एनआयएने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विमानाचे अपहरण किंवा ते कोसळवण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणात २०१६ च्या अँटी-हायजॅकिंग कायद्याचे कलम ३ आणि बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायदा अर्थात यूएपीएच्या कठोर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
 
 
NIA to probe Flydubai incident
 
 
एफआयआरनुसार, ओमानच्या सहवैमानिकाने विमानाचे अपहरण करण्याच्या किंवा ते क्रॅश करण्याच्या हेतूने कॅप्टन मच्छर यांच्यावर कॉकपिटमध्ये चाकूने हल्ला केला. जखमी होऊनही वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी विमानावरील नियंत्रण कायम राखले आणि सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. त्यानंतर सौदी अधिकाऱ्यांनी सहवैमानिकाला अटक केली. केंद्र सरकारने या घटनेचा आढावा घेतल्यानंतर हा गुन्हा अँटी-हायजॅकिंग कायदा आणि यूएपीएच्या कक्षेत येत असल्याचे निष्पन्न झाले. हे दोन्ही कायदे एनआयए कायदा, २००८ मधील अनुसूचित तरतुदींमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे एनआयए कायद्याच्या कलम ६ मधील उपकलम (५) आणि (८) यांचा कलम ८ सोबत संदर्भ घेत केंद्र सरकारने तपास सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र, हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता किंवा या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग होता का, याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आलेला नाही.
 
 
 
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गेल्या बुधवारी कॅप्टन स्मित मच्छर यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. अबू धाबी येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावास कॅप्टन मच्छर यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. यासाठी दूतावास त्यांचे कुटुंबीय, डॉक्टर, रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. प्रवासी विमानाचे अपहरण किंवा ते कोसळवण्याचा कथित प्रयत्न लक्षात घेता या प्रकरणाचा तपास देशाच्या प्रमुख दहशतवादविरोधी यंत्रणेकडे सोपवण्यात आला असून, हल्ल्यामागील कारणांचा शोध आता एनआयए घेणार आहे.