मुंबई.
Pandharpur Wari – In the Footsteps of the Saints महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख जगभर पोहोचवणाऱ्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा बहुमान मिळवला आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ या श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून वारीची समृद्ध परंपरा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांना या सन्मानामुळे नवी ओळख मिळाली आहे. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेल्या या माहितीपटाचे डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवर प्रसारण करण्यात आले आहे.
संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि शेकडो वर्षांची पंढरपूर वारीची परंपरा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी २२ मिनिटांचा इंग्रजी भाषेतील हा माहितीपट तयार करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे अभिनंदन केले. पंढरपूर वारी ही जात, धर्म तसेच गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या भक्तीत एकत्र आणणारी प्राचीन परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. या गौरवशाली परंपरेची माहिती देणारा माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांतून सादर झालेल्या दर्जेदार निर्मितींमधून या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. या यशामुळे महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, संतसाहित्य, सामाजिक समतेचा विचार आणि वारीचे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला जागतिक व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देणारा हा सन्मान राज्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.